नवी दिल्ली : फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने इंडियन प्रीमियर लीग 2023 च्या 16 व्या आवृत्तीत धमाकेदार सुरुवात केली. स्पर्धेत आतापर्यंत खेळल्या गेलेल्या पाच सामन्यांमध्ये संघाने दोन विजय मिळवले असून तीन सामन्यात त्यांना पराभव पत्कारावा लागला आहे. या स्पर्धेत त्यांच्या टॉप ऑर्डरने आत्तापर्यंत दमदार कामगिरी केली असून बाकीची फलंदाजी मात्र सामान्य राहिली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या या कमतरतेकडे भारताच्या एका माजी खेळाडूने लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.
'फलंदाजीची रणनीती बदलण्याचा प्रयत्न करावा' : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या फलंदाजीतील एका मोठ्या त्रुटीकडे लक्ष वेधून भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खान म्हणाला की, बंगळुरूच्या आघाडीच्या फळीतील फलंदाज धावा करत आहेत, पण तळाच्या फळीकडून त्यांना साथ मिळत नाही. विकेटकीपर दिनेश कार्तिक जर आपला फॉर्म परत मिळवू शकला नाही, तर संपूर्ण स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी ही समस्या कायम राहू शकते. आरसीबीने आपल्या फलंदाजीची रणनीती बदलण्याचा प्रयत्न करावा. यासोबतच गरजेनुसार फलंदाजी क्रम बदलणेही आवश्यक आहे, असे झहीर खानने म्हटले आहे.
'मधल्या फळीतील फलंदाजांनी जबाबदारी घ्यावी' : झहीर खान पुढे म्हणाला की, फाफ डू प्लेसिस आणि मॅक्सवेलने चेन्नईविरुद्ध ज्या पद्धतीने फलंदाजी केली, त्यांच्यावर विराट कोहली लवकर बाद झाल्याचा परिणाम दिसला नाही. यानंतर सामना जिंकवून देण्याची जबाबदारी मधल्या फळीतील फलंदाजांवर आली. मात्र त्यांनी आपले काम चोख बजावले नाही आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने हा सामना 8 धावांनी गमावला. एका फलंदाजाने शेवटपर्यंत फिनिशर म्हणून जबाबदारी स्वीकारली पाहिजे. दिनेश कार्तिक हे काम करू शकतो. पण तो 17 व्या षटकात बाद झाला आणि इथून सामना हाताबाहेर जाऊ लागला.
पार्थिव पटेलने केले कॉनवेचे कौतुक : भारताचा आणखी एक माजी क्रिकेटपटू पार्थिव पटेलने चेन्नईच्या डेव्हॉन कॉनवेच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. त्याने कॉनवेची फलंदाजी खास असल्याचे म्हटले आहे. पार्थिव म्हणाला की, कॉनवे सुरुवातीला स्थिर होण्यासाठी थोडा वेळ घेतो, पण त्यानंतर तो मोकळेपणाने खेळतो. तसेच त्याच्यात बराच वेळ खेळण्याची क्षमता आहे. प्रत्येक संघाला एका अशा फलंदाजाची गरज आहे जो एका टोकाला किमान 14 - 15 षटके खेळू शकेल आणि स्ट्राइक रेट चांगला ठेवेल, आणि जर नंतर खेळायला आला तर शेवटपर्यंत फलंदाजी करून मॅच फिनिश देखील करू शकेल.
हेही वाचा : IPL 2023 : मुंबई इंडियन्सचा कर्णधार हिटमॅन हैदराबादमध्ये करणार आणखी एक विक्रम..!