नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीगचा प्रवास जसजसा पुढे जात आहे, तसतशी ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅपची शर्यतही रोमांचक होत आहे. आत्तापर्यंत संपलेल्या 15 सामन्यांनंतरच्या आकडेवारीवर नजर टाकली असता पंजाब किंग्जच्या शिखर धवनने ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आघाडी घेतली आहे. तर पर्पल कॅपच्या शर्यतीत लखनऊचा मार्क वुड आघाडीवर आहे.
ऑरेंज कॅपची शर्यत : ऑरेंज कॅपच्या शर्यतीत पंजाब किंग्जचा कर्णधार शिखर धवन सध्या मोठ्या आघाडीवर आहे. दुसऱ्या स्थानावर चेन्नई सुपर किंग्जचा ऋतुराज गायकवाड आहे. शिखर धवनने आत्तापर्यंत 3 डावात 225 धावा केल्या आहेत, तर ऋतुराज गायकवाड 189 धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे. या यादीत बंगळुरूचा कर्णधार फाफ डु प्लेसिस, विराट कोहली शिवाय दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरचाही समावेश आहे.
पर्पल कॅपची शर्यत : पर्पल कॅपच्या शर्यतीत लखनऊ सुपर जायंट्सच्या मार्क वुडने गुजरात टायटन्सचा स्टार फिरकी गोलंदाज राशिद खानकडून पुन्हा एकदा अव्वल स्थान हिसकावून घेतले आहे. मार्क वुडने आतापर्यंत खेळलेल्या 3 सामन्यात सर्वाधिक 9 विकेट्स घेतल्या आहेत. तर राजस्थानचा युझवेंद्र चहल आणि रशीद खान यांच्या नावावर प्रत्येकी 8 - 8 विकेट्स आहेत. त्याचबरोबर रवी बिश्नोई आणि अल्झारी जोसेफ यांनी 6 - 6 विकेट घेतल्या आहेत.
गुणतालिका : ऑरेंज आणि पर्पल कॅपच्या शर्यतीप्रमाणेच गुणतालिकेत संघांची स्थितीही दिवसेंदिवस वर - खाली होत आहे. ज्या संघाने सामना जिंकला त्या संघाची गुणतालिकेतील स्थिती सुधारत आहे. सोमवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात खेळल्या गेलेल्या 15 व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव करत गुणतालिकेत अव्वल स्थान गाठले. आश्चर्याचे म्हणजे, सर्वाधिक 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकणारा मुंबई इंडियन्सचा संघ गुणतालिकेत सध्या तळाशी आहे.
हे ही वाचा : IPL 2023 : आरसीबीच्या अब्रुचे धिंडवडे, केला 'हा' आणखी एक लाजिरवाणा विक्रम