दुबई - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने हर्षल पटेलच्या हॅट्ट्रिक व ग्लेन मैक्सवेलच्या धडाकेबाज अर्धशतकी खेळीच्या जोरावर रविवारी (दि. 26 सप्टेंबर) मुंबई इंडियन्सचा 54 धावांनी पराभव केला आहे.
कर्णधार विराट कोहलीने 42 चेंडूत तीन षटकार व तीन चौकारासह 51 धावा तर ग्लेन मॅक्सवेलने केवळ 37 चेंडूत तीन षटकार व सहा चौकाराच्या मदतीने 56 धावा केल्या. कोहली व मॅक्सवेलच्या तुफानी फलंदाजीमुळे आरसीबी सहा गडी गमावून 165 काढत मुंबईसाठी 166 धावांचे आव्हान दिले.
आरसीबीच्या गोलंदाजांनीही शानदार प्रदर्शन केले. हर्षल पटेल या सामन्यात हॅट्रीक करत 'पर्पल कॅप'चा प्रबळ दावेदार ठरला आहे. त्याने या सामन्यात केवळ 17 धावा देत चौघांचा बळी घेतला. तसेच युजवेंद्र चहलने 11 धावा देत तिघांना तंबूत धाडले. मॅक्सवेलने उत्तम फलंदाजीनंतर चार षटकांत 23 धावा देत रोहित शर्मा व कृणाल पंड्या या दोघांचे विकेट घेत मुंबईला मोठा झटका दिला तर मोहम्मद सिराजने सूर्यकुमार यादवचा बळी घेतला. परिणामी मुंबई इंडियन्सचा संघ 18.1 षटकांत 111 धावांसह गारद झाला.
मुंबई इंडियन्स सातव्या स्थानावर
हा सामना खिशात घातल्यानंतर आरसीबीने 12 गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली तर मुंबई इंडियन्स सातव्या स्थानावर फेकली गेली.
दोन गडी गमावल्यानंतर मुंबईचा संघ स्वस्तात झाला गारद
मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा 28 चेंडूत पाच चौकार व एका षटकाराच्या मदतीने 43 धावा केल्या व यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डिकॉकने शानदार सुरुवात केली, होती. ज्यामुळे मुंबईने पावरप्लेमध्ये एकही गडी न गमावता 56 धावा काढल्या होत्या. पण, पुढच्याच षटकात डिकॉक 23 चेंडूत चार चौकाराच्या मदतीने 24 धावा काढत चहलच्या चेंडूला फटका मारत मॅक्सवेलला झेल दिले. त्यानंतर रोहित शर्माही बाद झाला. त्यावेळी 10 षटकांत 79 धावा, असा मुंबईचा धावफलक होता. त्यानंतर केवळ 111 धावांत संपूर्ण संघ गारद झाला.
राहुलला बाद करत पटेलने पूर्ण केली 'हॅट्ट्रिक' व झाला 'पर्पल कॅप'चा दावेदार
हार्दिक पंड्या फंलदाजीसाठी मैदानात उतरला. पण, केवळ सहा चेंडूत हर्षल पटेलच्या चेंडूवर लेग साइडकडे फटका मारण्याच्या प्रयत्नात कोहलीकडे झेल दिला. त्यानंतर पटेलने पोलार्डचा (07) बळी घेतला. त्यानंतर पटेलने राहुल चहरला बाद करत आपली हॅट्रीक पूर्ण केली आणि पर्पल कॅपसाठी प्रमुख दावेदार ठरला.
टी २० मध्ये विराट झाला 'दहा हजारी'
आरसीबीचा कर्णधार विराट कोहली या सामन्यात मुंबई विरोधात 13वी धाव घेत टी 20 मध्ये आपल्या दहा हजार धावा पूर्ण केल्या. टी 20 मध्ये 10 हजार धावा पूर्ण करणारा तो पहिला भारतीय ठरला आहे.
हेही वाचा - KKR VS CSK : चुरशीच्या सामन्यात चेन्नईचा केकेआरवर विजय