नवी दिल्ली - भारताचा महान माजी फलंदाज सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर १८ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या आयपीएल-२०२१च्या लिलावात आपले नशीब आजमवणार आहे. अर्जुनने या आयपीएलच्या लिलावासाठी नोंदणी केली आहे. लिलावासाठी एकूण १०९७ खेळाडू आपले नशीब आजमवणार आहेत. यात २०७ आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा समावेश आहे. आयपीएलच्या नव्या पर्वासाठी खेळाडूंच्या नोंदणीची अंतिम तारीख गुरुवारी (४ फेब्रुवारी) संपली.
हेही वाचा - खास सामन्यात रूटचे शतक आणि हॅट्ट्रिक!
मीडिया रिपोर्टनुसार, अर्जुनबरोबर बंदीनंतर क्रिकेटच्या मैदानात परतलेला वेगवान गोलंदाज एस. श्रीशांतही लिलावासाठी उपलब्ध होणार आहे. डावखुरा वेगवान गोलंदाज अर्जुनची मूळ किंमत (बेस प्राईज) २० लाख रुपये आहे. नुकताच तो सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये मुंबईकडून खेळला होता आणि तो काही काळ मुंबई इंडियन्स संघाबरोबर प्रशिक्षण घेत होता.
श्रीशांतवरील बंदी यावर्षी सप्टेंबरमध्ये संपुष्टात आली. त्यानंतर तो सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये खेळला. त्यांची मूळ किंमत ७५ लाख रुपये आहे.
कोणत्या संघाकडे किती रक्कम -
दुपारी तीन वाजता लिलाव सुरू होईल. किंग्ज इलेव्हन पंजाब सर्वाधिक ५३.२० कोटी रुपयांच्या रकमेसहसह लिलावात प्रवेश करेल. त्याखालोखाल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (३५.९० कोटी), राजस्थान रॉयल्स ३४.८५ कोटी), चेन्नई सुपर किंग्ज (२२.९० कोटी), मुंबई इंडियन्स (१५.३५ कोटी), दिल्ली कॅपिटल्स (१२.९ कोटी) आणि कोलकाता नाईट रायडर्स यांचा समावेश आहे. सनरायझर्स हैदराबाद (दोन्ही १०.७५ कोटी) असे संघ आहेत.