मुंबई: राजस्थान रॉयल्सचा फलंदाज शिमरॉन हेटमायर पुन्हा संघात सामील झाला ( Shimron Hetmyer return to join RR ) आहे. शुक्रवारी संघाच्या अंतिम साखळी सामन्यासाठी तो उपलब्ध होण्याची शक्यता आहे. वेस्ट इंडिजचा हा बिग हिटर आपल्या पहिल्या मुलाच्या जन्मासाठी गयानाला गेला होता. त्यामुळे तो दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात खेळू शकला नाही.
इंडियन प्रीमियर लीग ( Indian Premier League ) मधील एका सूत्राने पीटीआयला सांगितले की, हेटमायर परतला आहे आणि सध्या तो आयसोलेशनमध्ये आहे. राजस्थान रॉयल्स सध्या पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. त्यांनी लखनौला 24 धावांनी पराभूत करून पहिल्या दोनमध्ये स्थान मिळवले आहे. त्यांचा साखळी फेरीतील शेवटचा सामना शुक्रवारी चेन्नई सुपर किंग्जशी होणार आहे. 25 वर्षीय हेटमायरला रॉयल्सने लिलावात 8.5 कोटी रुपयांना विकत घेतले. त्याने या मोसमात आतापर्यंत 11 सामन्यांत 166.29 च्या स्ट्राईक रेटने आणि 72.75 च्या सरासरीने 291 धावा केल्या आहेत.
उल्लेखनीय म्हणजे, हेटमायर हा गेल्या वर्षी टी-20 विश्वचषकात वेस्ट इंडिजसाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता, परंतु तो त्याच्या फिटनेस समस्येमुळे चर्चेत आला होता. डिसेंबरमध्ये, वेस्ट इंडिजचे मुख्य प्रशिक्षक फिल सिमन्स ( West Indies head coach Phil Simmons ) म्हणाले की, हेटमायर वेस्ट इंडिज संघात स्थान मिळवण्यासाठी अनिवार्य फिटनेस मानकांची पूर्तता करण्यात अयशस्वी ठरला हे हृदयद्रावक आहे.