हैदराबाद: आयपीएल 2022 ( IPL 2022 ) चा लीग टप्पा संपण्याच्या मार्गावर आहे. कारण प्लेऑफमध्ये स्थान मिळवणाऱ्या संघाचे चित्र आता स्पष्ट होत आहे. बुधवारी (18 मे) कोलकाताविरुद्ध दोन धावांनी विजय मिळवून लखनौने ( KKR vs LSG ) प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे गुजरात संघानंतर प्लेऑफमध्ये स्थान पटकावणारा दुसरा संघ ठरला आहे.
लखनौ संघाचे 18 गुण झाले आहेत आणि हा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. राजस्थान संघाने शेवटचा सामना जिंकल्यास लखनौला पहिला एलिमिनेटर खेळावा लागेल. त्याचवेळी राजस्थान हरल्यास लखनौला पहिला क्वालिफायर खेळता येईल. पर्पल कॅपच्या शर्यतीत युझवेंद्र चहल ( Yuzvendra Chahal leads Purple Cap race ) अजूनही आघाडीवर आहे. तसेच कोलकाताविरुद्ध नाबाद 140 धावांची खेळी करणारा क्विंटन डी कॉक ऑरेंज कॅपच्या शर्यतीत तिसरा स्थानी आला आहे.
आयपीएल 2022 च्या गुणतालिकेतील सध्याची स्थिती -
13 सामन्यांत 10 विजय मिळवणारा गुजरातचा संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर कायम आहे. गुजरातचे 20 गुण आहेत आणि हा संघ पहिला क्वालिफायर खेळणार आहे. कोलकात्याच्या विजयासह लखनौचा संघही प्लेऑफमध्ये पोहोचला आहे. लखनौचे 18 गुण आहेत, परंतु त्याचे स्थान अद्याप निश्चित झालेले नाही. लखनौसाठी क्वालिफायर किंवा एलिमिनेटर खेळणे हे राजस्थानच्या सामन्याच्या निकालावर अवलंबून आहे.
राजस्थानचा संघ 13 पैकी 8 विजयांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. सध्या राजस्थानचे 16 गुण आहेत. प्लेऑफमधील आपले स्थान पक्के करण्यासाठी राजस्थानला शेवटचा सामना जिंकावा लागेल. दिल्लीचा संघ 13 सामन्यांत सात विजयांसह चौथ्या स्थानावर आहे. दिल्लीचे 14 गुण असून, शेवटचा सामना जिंकल्यास दिल्ली प्लेऑफमध्येही पोहोचू शकते.
त्याचवेळी आरसीबीचा संघ 14 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. शेवटचा सामना जिंकूनही आरसीबीचा प्लेऑफमध्ये प्रवेश निश्चित नाही. कोलकाता 14 सामन्यांत 12 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे, मात्र हा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर आहे. सातव्या क्रमांकावर असलेल्या पंजाब आणि आठव्या स्थानावर असलेल्या हैदराबादच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा धूसर आहेत. दोन्ही संघांचे 13 सामन्यांत 12 गुण आहेत. चेन्नई आणि मुंबई आधीच प्ले ऑफमधून बाहेर आहेत. चेन्नईचे 13 सामन्यांत आठ गुण आहेत तर मुंबईचे १३ सामन्यांत सहा गुण आहेत.
सर्वाधिक धावा करणारे फलंदाज (ऑरेंज कॅप) -
राजस्थानचा सलामीवीर जोस बटलर ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आघाडीवर आहे. त्याने 13 सामन्यात 627 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर लखनौचा कर्णधार केएल राहुल दुसऱ्या तर क्विंटन डी कॉक तिसऱ्या क्रमांकावर आहे.
सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज (पर्पल कॅप ) -
सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत राजस्थान रॉयल्सचा फिरकीपट्टू युझवेंद्र चहल आघाडीवर आहे. चहलने 13 सामन्यात 24 विकेट घेतल्या आहेत. त्याचवेळी दुसऱ्या क्रमांकावर असणार्या हसरंगाच्या नावावर 13 सामन्यांमध्ये 23 विकेट्स आहेत. तसेच तिसऱ्या क्रमांकावर पंजाब किंग्जचा कगिसो रबाडा आहे. ज्याने 12 सामन्यात 22 विकेट्स घेतल्या आहेत.
हेही वाचा - Hockey India Announces Squad : बेल्जियम आणि नेदरलँडमधील सामन्यांसाठी हॉकी इंडियाचा संघ जाहीर