मुंबई - भारतातील कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर अनेक परदेशी खेळाडूंनी स्पर्धेतून माघार घेतली आहे. यात आता पंचांच्या रुपाने भर पडली आहे. आयसीसीच्या एलिट पॅलनमधील सदस्य असलेले भारताचे नितीन मेनन आणि ऑस्ट्रेलियाचे पॉल रेफेल यांनी वैयक्तिक कारणामुळे स्पर्धेतून माघार घेतली आहे.
नितीन मेनन यांच्या आई कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे मेनन यांनी स्पर्धेतून माघार घेतली आहे. ते इंदौर येथील त्यांच्या राहत्या घरी परतले आहेत. तर पॉल रेफेल यांनी ऑस्ट्रेलियन सरकारने भारतीय विमानांवर घातलेल्या बंदीच्या पार्श्वभूमीवर मायदेशात परतण्याचा निर्णय घेतला आहे.
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, मेनन यांना लहान मूल आहे तसेच त्यांच्या आईसह पत्नीला देखील कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे लहान मुलासोबत राहणं हे प्राधान्य असल्यामुळे त्यांनी स्पर्धेतून माघार घेतली आहे. तर रेफेल यांना ऑस्ट्रेलियन सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे मायदेशी परतता येणार नाही, अशी भीती आहे. बीसीसीआयने याआधीच बॅकअप प्लॅन म्हणून भारतीय पंचांची नियुक्ती केलेली आहे.
दरम्यान, याआधी पाच खेळाडूंनी विविध कारण देत आयपीएलमधून माघार घेतली आहे. यात दिल्ली कॅपिटल्स संघाचा मुख्य फिरकीपटू आर. अश्विन, इंग्लंडच्या लियाम लिव्हिंगस्टोन, ऑस्ट्रेलियाचे अॅडम झम्पा, अँड्र्यू टाय आणि केन रिचर्डसन याचा समावेश आहे.
हेही वाचा - IPL २०२१ : मोहम्मद सिराज नवा यॉर्कर 'किंग', पाहा जबराट व्हिडिओ
हेही वाचा - मॅच फिक्सिंग प्रकरणी ICC चा दणका; श्रीलंकेच्या गोलंदाजावर ६ वर्षाची बंदी