दुबई - आयपीएल 2021 च्या दुसऱ्या सत्रात कोरोनाचा शिरकाव झाल्याचे समोर आले आहे. सनरायझर्स हैदराबाद संघाचा वेगवान गोलंदाज टी. नटराजन याला कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे नटराजनच्या संपर्कात आलेल्या खेळाडूंना तसेच सपोर्ट स्टाफमधील सदस्यांना आयसोलेट करण्यात आले आहे. ते मेडिकल टीमच्या निगराणीत आहेत.
सनरायझर्स हैदराबादच्या स्क्वॉडमध्ये यांना करण्यात आलं आयसोलेट -
मेडिकल टीमने टी. नटराजन याच्या संपर्कात आलेल्या 6 जणांना आयसोलेट केले आहे. यात विजय शंकर, टीम मॅनेंजर विजय कुमार, फिजियोथेरेटपिस्ट श्याम सुंदर जे, डॉक्टर अंजना वन्नन, लॉजिस्टिक मॅनेजर तुषार खेडकर आणि नेट गोलंदाज पेरियासामी गणेशन याचा समावेश आहे.
सनरायझर्स हैदराबाद विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स सामना होणार रद्द?
आज आयपीएल 2021 मध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना होणार आहे. त्याआधी टी. नटराजन यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. यामुळे हा सामना होणार नाही, याविषयीची चर्चा रंगली आहे. पण बीसीसीआयने हा सामना नियोजित वेळेनुसार होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
बीसीसीआयने या संदर्भात एक परिपत्रक जारी केले आहे. यानुसार, सनरायझर्स हैदराबादचा खेळाडू टी. नटराजन आरटी-पीसीआर चाचणीत कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्याला संघापासून वेगळं करण्यात आलं आहे. त्याच्यात कोणतीही लक्षणे नाहीत. हैदराबाद संघातील खेळाडूंची चाचणी आज सकाळी 5 वाजता करण्यात आली. यात संपर्कातील व्यक्तींचा देखील समावेश आहे. सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. यामुळे आजचा दिल्ली विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद यांच्यातील सामना नियोजित वेळेनुसार खेळला जाईल.
दरम्यान, आयपीएल 2021 च्या हंगामाला मे महिन्यात भारतात सुरूवात झाली. तेव्हा भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. तसेच काही खेळाडू आणि सपोर्ट स्टाफमधील सदस्यांना कोरोनाची लागण झाली. तेव्हा बीसीसीआयने हा हंगाम तात्काळ स्थगित केला. आता हा उर्वरित हंगाम यूएईमध्ये खेळवला जात आहे. अशात खेळाडूला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. त्यामुळे आयपीएल 2021 वर अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले आहे.
हेही वाचा - IPL 2021 : दिल्ली कॅपिटल्स VS सनरायझर्स हैदराबाद मॅच प्रिव्हयू
हेही वाचा - IPL 2021: कार्तिकने काय षटक फेकले, दिग्गजांकडून कार्तिक त्यागीचे कौतुक