चेन्नई - आयपीएल २०२१ मध्ये आज पहिल्यांदाज डबल हेडर (एका दिवशी दोन सामने) सामने होणार आहेत. यातील पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला जाणार आहे. हा सामना चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियममध्ये होणार असून दुपारी ३ वाजून ३० मिनिटाला या सामन्याला सुरूवात होणार आहे.
विराट कोहलीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या बंगळुरू संघाने आपले पहिले दोन्ही सामने जिंकले आहेत. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे. ते आजचा सामना जिंकून विजयाची हॅट्ट्रीक नोंदवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. तर दुसरीकडे यंदाच्या स्पर्धेत संमिश्र यश मिळवलेल्या कोलकाता संघाच्या कामगिरीबाबत अद्यापही अनेक प्रश्न आहेत. अत्यंत कमी धावसंख्या उभारूनही मुंबई इंडियन्सने कोलकाताचा निसटता पराभव केला होता. हाच पराभव त्यांच्या जिव्हारी लागला आहे.
बंगळुरू आपल्या पहिल्या सामन्यात मुंबईचा पराभव केला व स्पर्धेत विजयी सलामी दिली. तर दुसऱ्या सामन्यात त्यांनी सनरायजर्स हैदराबादला पराभूत केले. बंगळुरूचे सर्व खेळाडू भरात आहेत. कर्णधार कोहली देखील सातत्याने धावा करत आहे. मात्र, त्याला मोठी खेळी करण्यात यश आलेले नाही. त्यातच एबी डिव्हिलियर्सलाही कामगिरीत सातत्य राखता आलेले नाही. देवदत्त पडीक्कल व शाहबाज अहमद यांना येत असलेले अपयश त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरत आहे. बंगळुरू संघात हर्षल पटेल, शाहबाज अहमद व कायले जेमिसन व मोहम्मद सिराज असे होतकरू गोलंदाज आहेत.
कोलकाताच्या खेळाडूंना केवळ खेळातील बदलच नव्हे तर संघातील प्रत्येकाला जबाबदारी ओळखून खेळ करावा लागणार आहे. मुंबईविरुद्ध विजयाची निश्चिती वाटत असतानाच त्यांच्या फलंदाजांनी नांगी टाकल्याने अवघ्या १० धावांनी सामना गमावला. नितीश राणा, शुबमन गिल यांचा अपवाद वगळता त्यांच्या एकाही फलंदाजाला सरस कामगिरी करता आलेली नाही. त्यातही अनुभवी दिनेश कार्तिक, आंद्रे रसेल, राहुल त्रिपाठी यांनीही साफ निराशा केली. अष्टपैलू शकिब अल हसन याला अद्याप सूर गवसलेला नाही. पण गोलंदाजीत कोलकाताच्या गोलंदाजांनी धावा रोखण्यात यश मिळवले आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ -
विराट कोहली (कर्णधार), एबी डिव्हिलियर्स, देवदत्त पडिक्कल, युजवेंद्र चहल, मोहम्मद सिराज, केन रिचर्डसन, वॉशिंग्टन सुंदर, पावन देशपांडे, जोशुआ फिलिप, शाहबाज आहमद, नवदीप सैनी, एडम झम्पा, कायल जेमिसन, रजत पाटीदार, सचिन बेबी, मोहम्मद अजहरुद्दीन, डॅन क्रिश्चियन, के एस भारत, सुयश प्रभुदेसाई, डॅनियल सॅम्स आणि हर्षल पटेल.
कोलकाता नाइट राइडर्सचा संघ -
इयॉन मॉर्गन (कर्णधार), दिनेश कार्तिक, शुबमन गिल, नितीश राणा, टिम सेफर्ट, रिंकू सिंह, आंद्रे रसेल, सुनील नरेन, कुलदीप यादव, शिवानी मावी, लॉकी फर्ग्यूसन, पॅट कमिन्स, कमलेश नागरकोटी, संदीप वारियर, प्रसिद्ध कृष्णा, राहुल त्रिपाठी, वरुण चक्रवर्ती, शाकिब अल हसन, शेल्डन जॅक्सन, वैभव अरोडा, हरभजन सिंह, करुण नायर, बेन कटिंग, वेंकटेश अय्यर आणि पवन नेगी.
हेही वाचा - कोरोनावर मात करून बंगळुरू संघात सामिल झाला 'हा' स्टार खेळाडू
हेही वाचा - IPL २०२१ : मुंबई इंडियन्सपुढे सनरायझर्स हैदराबाद मावळला; १३ धावांनी पराभव