शारजाह - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्सचा 6 धावांनी पराभव केला. बंगळुरूने प्रथम फलंदाजी करताना पंजाबसमोर विजयासाठी 165 धावांचे आव्हान ठेवले होते. प्रत्युत्तरादाखल पंजाब संघाला 20 षटकात 6 बाद 158 धावांपर्यंत मजल मारता आली. या विजयासह बंगळुरूने प्ले ऑफ फेरीतील स्थान निश्चित केले आहे. दुसरीकडे पंजाबचे स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे.
बंगळुरूच्या 165 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या पंजाबची सुरूवात दणक्यात झाली. कर्णधार के एल राहुल आणि मयांक अगरवाल या जोडीने पंजाबला 10.5 षटकात 91 धावांची सलामी दिली. शाहबाज अहमदने राहुलला बाद करत पंजाबला पहिला धक्का दिला. राहुलने 35 चेंडूत 1 चौकार आणि 2 षटकारांसह 39 धावांची खेळी केली. यानंतर निकोलस पूरनची (3) शिकार चहलने केली. यादरम्यान, मयांकने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याची विकेट चहलने घेतली. त्याने 42 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकारांसह 57 धावा केल्या. मयांकचा झेल सिराजने घेतला.
मयांक पाठोपाठ सर्फराज खान देखील चहलने माघारी धाडलं. त्याला तर भोपळाही फोडता आला नाही. मार्करम आणि शाहरूख खान जोडीने फटकेबाजी करत सामन्यात रंगत आणली. पण गार्टनने मार्करमला बाद केले. त्याने 14 चेंडूत 20 धावा केल्या. यानंतर शाहरूख खान 20व्या षटकात धावबाद झाला. त्याने 16 धावा केल्या. बंगळुरूकडून चहलने सर्वाधिक 3 गडी बाद केले. तर गार्टन, अहमद यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
त्याआधी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर बंगळुरूची सलामीवीर जोडी विराट कोहली आणि देवदत्त पडीक्कल मैदानात आले. त्यांनी सावध खेळ केला. दोघांनी 9.4 षटकात 68 धावांची सलामी दिली. हेनरिक्सने बंगळुरूला एकपाठोपाठ तीन सलग धक्के दिले.
हेनरिक्सने 10व्या षटकातील चौथ्या चेंडूवर विराट कोहलीला क्लिन बोल्ड केले. विराटने 24 चेंडूत 2 चौकार आणि 1 षटकारांसह 25 धावा केल्या. यानंतर पुढील चेंडूवर हेनरिक्सने डॅनियल ख्रिश्चिनची शिकार केली. त्याचा झेल सर्फराज खानने घेतला. त्याला भोपळाही फोडता आला नाही. 12व्या षटकात हेनरिक्सने देवदत्त पडीक्कल याला बाद केले. पडीक्कलने 38 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकारासह 40 धावांचे योगदान दिले.
बिनबाद 68 वरून बंगळुरूची अवस्था 3 बाद 73 अशी झाली. तेव्हा फॉर्मात असलेल्या ग्लेन मॅक्सवेलने मोर्चा सांभाळला. त्याने पंजाबच्या फिरकी गोलंदाजीवर जोरदार हल्ला चढवला. त्याने बरार आणि बिश्नोई यांच्या गोलंदाजीवर गगनचुंबी षटकार मारले. त्याला डिव्हिलियर्सची साथ लाभली. दोघांनी चौथ्या गड्यासाठी अर्धशतकी भागिदारी केली.
हाणामारीच्या षटकात डिव्हिलियर्स धावबाद झाला. त्याने 1 चौकार आणि 2 षटकारांसह 23 धावांचे योगदान दिले. मॅक्सवेल अखेरच्या षटकात बाद झाला. त्याने 33 चेंडूत 57 धावांची खेळी साकारली. यात 3 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश आहे. शाहबाज अहमदने 8 धावांचे योगदान दिले. गार्टन शून्यावर परतला. तर श्रीकर भरत शून्यावर तर हर्षल पटेल 1 धावेवर नाबाद राहिला. अखेरीस बंगळुरूला 164 धावांपर्यंत मजल मारता आली. पंजाबकडून हेनरिक्स आणि शमीने प्रत्येकी 3-3 गडी बाद केले.
हेही वाचा - IPL 2021 : गायकवाडच्या शतकी खेळीनंतर प्रशिक्षक फ्लेमिंगची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले...
हेही वाचा - KKR VS SRH : नाणेफेक जिंकून हैदराबादचा फलंदाजीचा निर्णय