अहमदाबाद - आयपीएल २०२१ मध्ये २२ वा सामना रंगतदार झाला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिल्ली कॅपिटल्सवर एका धावेने विजय साकारला. दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. बंगळुरूने एबी डिव्हिलियर्सच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर दिल्लीला १७२ धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीच्या ऋषभ पंत आणि शिमरोन हेटमायरने प्रयत्नांची पराकाष्ठा केली, पण त्यांना अपयश आले. शेवटच्या षटकात दिल्लीला विजयासाठी १४ धावांची गरज असताना मोहम्मद सिराजने १२ धावा देत बंगळुरूच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
दिल्लीने नाणेफेक जिंकून बंगळुरूला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. तेव्हा विराट कोहली मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. आवेश खानने विराटला क्लीन बोल्ड केलं. विराटने १२ धावा केल्या. यानंतर पुढच्या षटकातील दुसरा सलामीवीर देवदत्त पडीक्कल इशांत शर्माचा बळी ठरला. पडीक्कल १२ धावांवर क्लीन बोल्ड झाला. तेव्हा मॅक्सवेल आणि रजत पाटीदार यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण अनुभवी अमित मिश्राने मॅक्सवेलला स्टिव्ह स्मिथकडे झेल देण्यात भाग पाडले. मॅक्सवेलने २० चेंडूत १ चौकार आणि २ षटकारांसह २५ धावा केल्या.
डिव्हिलियर्स-पाटीदार या जोडीने चौथ्या गड्यासाठी अर्धशतकी भागिदारी करत संघाला १४व्या षटकात शतकी टप्पा पार करून दिला. चांगल्या लयीत खेळणाऱ्या पाटीदारला अक्षर पटेलने तंबूचा रस्ता दाखवला. पाटीदारने ३१ धावा केल्या. त्याचा झेल स्मिथने घेतला. डिव्हिलियर्सने दुसरी बाजू लावून धरत अर्धशतक झळकावले. त्याने ४२ चेंडूत नाबाद ७५ धावा केल्या. यात ३ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश आहे. सुंदर ६ धावांवर बाद झाला. तर सॅम्स ३ धावांवर नाबाद राहिला. डिव्हिलियर्सने स्टॉयनिसने फेकलेल्या अखेरच्या विसाव्या षटकात ३ षटकारांसह २३ धावा झोडपल्या, यामुळे बंगळुरूला २० षटकात ५ बाद १७१ धावांपर्यंत मजल मारता आली. दिल्लीकडून इशांत, रबाडा, आवेश, अमित मिश्रा आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी १-१ गडी बाद केला.
हेही वाचा - निर्धास्त व्हा, तुम्हाला सुरक्षित घरी पोहोचवेपर्यंत आमच्यासाठी स्पर्धा संपलेली नाही - बीसीसीआय
हेही वाचा - जिंकलस भावा! ब्रेट ली याने भारताला ऑक्सिजन खरेदीसाठी दिली ४२ लाखांची मदत