मुंबई - भारतातील कोरोना स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. देशात दिवसाला ३.५ लाखाहून अधिक नवे कोरोना रुग्णांची भर पडत आहे. कोरोनाच्या या वाढत्या प्रादुर्भावामुळे काही क्रिकेटपटूंनी आयपीएल स्पर्धेतून माघार घेत मायदेश गाठला आहे. तर दुसरीकडे मुंबई इंडियन्सच्या क्रिकेटपटूने उलट मी बायो-बबलमध्येच सुरक्षित आहे, असे म्हटलं आहे.
राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज अँड्र्यू टाय, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे केन रिचर्डसन आणि अॅडम झॅम्पा या तीन ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी उर्वरित हंगामातून माघार घेत मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला. त्याआधी लियाम लिव्हिंगस्टोनने इंग्लंड गाठले आहे.
ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी मायदेशी परत जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मुंबई इंडियन्सचा ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज नॅथन कुल्टर-नाइल याला कळाली. तेव्हा त्याला आश्चर्य वाटले. त्याने, प्रत्येकाला स्वतःचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे. प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते. मात्र, मला घरी परतण्यापेक्षा बायो-बबलमध्ये राहणे सध्याच्या घडीला अधिक सुरक्षित वाटते, असे सांगितलं.
कुल्टर-नाइल म्हणाला की, 'कोरोना काळात आयपीएल होत आहे. यामुळे खेळाडूसाठी खास बायो-बबल तयार करण्यात आले आहे. यात खेळाडू राहत आहेत. त्यांना हॉटेलमधून बाहेर पडण्याची किंवा बाहेरील व्यक्तींना भेटण्याची परवानगी नाही. त्यामुळे बायो-बबलमध्ये राहणे पूर्णपणे सुरक्षित आहे. टाय, रिचर्डसन आणि झॅम्पा ऑस्ट्रेलियाला परत गेल्याचे ऐकून मला आश्चर्य वाटले. मात्र, त्यांच्याशी बोलल्यावर त्यांनी हा निर्णय का घेतला ते मला समजले.'
मी झॅम्पाशी बोललो आणि घरी परतणे त्याच्यासाठी का महत्वाचे आहे, हे त्याने मला सांगितले. त्याच्यासाठी कदाचित तो निर्णय योग्य होता. मात्र, मला घरी परतण्यापेक्षा बायो-बबलमध्ये राहणे सध्याच्या घडीला अधिक सुरक्षित वाटते, असे कुल्टर-नाइलने स्पष्ट केले.
दरम्यान, कुल्टर-नाइलला मागील खेळाडू लिलावात मुंबईने ५ कोटी रुपयांत खरेदी केले होते. परंतु, यंदा त्याला अजून सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही.
हेही वाचा - IPL २०२१ : पॅट कमिन्सचं कोरोनाविरुद्धच्या लढ्यात मोठं योगदान; पीएम केयरला दिली मोठी मदत
हेही वाचा - कोरोनाच्या भीतीने खेळाडू IPL मधून माघार घेत आहेत, BCCI म्हणते...