मुंबई - एबी डिव्हिलियर्सची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विस्फोटक फलंदाज म्हणून ओळख आहे. तो सध्या आयपीएल २०२१ स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. त्याने कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात तुफान फटकेबाजी करत नाबाद ७६ धावांची खेळी केली होती. आता त्याने टी-२० विश्वकरंडक स्पर्धेसाठी दक्षिण आफ्रिकेच्या संघात पुनरागमन करण्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामना संपल्यानंतर बोलताना डिव्हिलियर्स म्हणाला की, 'मागील वर्षी मला विचारण्यात आले की, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वापसीसाठी इच्छुक आहेस का? यावर मी निश्चितच तयार आहे असे उत्तर दिले. आयपीएलनंतर आम्ही पाहू की, माझा फॉर्म आणि फिटनेस कसा आहे. आम्ही त्यानुसारच रणनिती आखणार आहोत. मी आयपीएलच्या शेवटी मार्क बाऊचरसोबत चर्चा करेन.'
एबी डिव्हिलियर्सने टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत खेळावे म्हणून दक्षिण आफ्रिकेतूनच नव्हे तर जगभरातून सोशल मीडियाद्वारे जोरदार मागणी केली जात आहे. डिव्हिलियर्सने २३ मे २०१८ रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. तसेच तो जगभरातील क्रिकेट लीग स्पर्धांमध्ये अजूनही तुफान फटकेबाजी करताना दिसून येत आहे. आता त्याने टी-२० विश्व करंडक स्पर्धेत खेळण्याचे संकेत दिले आहेत. दरम्यान, यंदा टी-२० विश्वकरंडक स्पर्धा भारतात आयोजित करण्यात येणार आहे. या स्पर्धेला ऑक्टोबर महिन्यात सुरूवात होणार आहे.
हेही वाचा - IPL २०२१ : चहलने पहिली विकेट घेताच धनश्रीला अश्रू अनावर; पाहा व्हिडिओ
हेही वाचा - IPL २०२१ : पांड्या ब्रदर्सचा स्वॅग, हार्दिक अन् कृणालचा पत्नींसोबत भन्नाट डान्स, पाहा व्हिडिओ