शारजाह - आयपीएलच्या तेराव्या हंगामात आज सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात लढत होत आहे. या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. इतर मैदानाच्या तुलनेने लहान असलेल्या शारजाहच्या मैदानात यंदाच्या आयपीएलमध्ये चौकार-षटकारांचा पाऊस पडत आहे. मुंबईचा सलीमीवीर फलंदाज रोहित शर्माने या सामन्यात षटकार खेचून आपल्या खेळीची सुरुवात केली. मात्र पुढच्याच चेंडूवर तो बाद झाला.
या कामगिरीसह रोहितने एक नकोसा विक्रम आपल्या नावावर केला आहे. हैदराबादच्या संदीप शर्माने टाकलेल्या सामन्याच्या चौथ्याच चेंडूवर रोहितने षटकार खेचला होता. मात्र त्याच्या पुढच्याच चेंडूवर रोहित यष्टीरक्षक जॉनी बेअस्टोला झेल देऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याआधीचे सामन्यातील पहिले ३ चेंडू रोहितने निर्धाव खेळले. त्यामुळे रोहित हा आयपीएलच्या एका डावात षटकार खेचल्यानंतर बाद होणारा दुसराच भारतीय सलामीवीर आहे.
याआधी हा विक्रम चेतेश्वर पुजाराने केला आहे. २०१२मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध सलामीला खेळताना पुजारा षटकार मारल्यानंतरही वैयक्तिक ६ धावांवर बाद झाला होता. या दोघांव्यतिरिक्त ब्रेंडन मॅक्यूलम, ख्रिस गेल आणि ख्रिस लिन या परदेशी खेळाडूंनी हा विक्रम केला आहे. विशेष म्हणजे मॅक्यूलमच्या बाबतीत असे चार वेळा झाले आहे.
दोन्ही संघाचे आतापर्यंत चार सामने झाले आहेत. यात दोन्ही संघानी प्रत्येकी दोन-दोन सामने जिंकत ४ गुणांची कमाई केली आहे. गुणतालिकेत मुंबई तिसऱ्या तर हैदराबाद चौथ्या स्थानावर आहे. आजचा सामना जिंकून आणखी दोन गुणांची भर घालण्यासाठी दोन्ही संघ उत्सुक आहेत.