दुबई - दिल्ली कॅपिटल्सने पुन्हा एकदा दमदार कामगिरी करत बंगळुरूवर विजय मिळवला आहे. दुबई इंटरनॅनशन स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर 59 धावांनी मात केली आहे. दिल्लीने विजयासाठी दिलेल्या १९७ धावांचं आव्हान बंगळुरुला पेलवलं नाही. कर्णधार विराट कोहलीचा अपवाद वगळता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या इतर सर्व फलंदाजांनी दिल्लीच्या माऱ्यासमोर शरणागती पत्करली. बंगळुरुचा संघ १३७ धावांपर्यंतच मजल मारु शकला.
दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करत बंगळुरूला 196 धावांचं तगडं आव्हान दिलं. दिल्लीकडून स्टॉईनीसने सर्वाधिक 53 धावा काढल्या. तर सलामीवीर पृथ्वी शॉ (42) तर शिखर धवनने (32) धावा पटकावल्या. त्याचप्रमाणे ऋषभ पंतने देखील रनरेट वाढवण्यास मदत केली. पंतने 25 चेंडूत 37 धावा काढल्या.
दिल्लीने दिलेल्या लक्षाचा पाठलाग करताना बंगळुरूची दमछाक झाली. बंगळुरूकडून एकट्या विराट कोहलीने सामना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला परंतू 43 धावा काढून तो देखील बाद झाला. अॅरोन फिंचने (13), वॉशिंग्टन सुंदरने (17) धावा पटकावल्या. बंगळुरू संघ 20 षटकामध्ये केवळ 137 धावाच पटकावू शकला. दिल्ली कडून कागीसो रबाडा आणि अक्षर पटेल या दोघांनी अनुक्रमे 4 आणि 2 गडी बाद केले