अबुधाबी - सलामीवीर शिखर धवन आणि अजिंक्य रहाणे यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे आव्हान सहज पेलले. या विजयामुळे दिल्ली प्लेऑफसाठी पात्र होणारा दुसरा संघ ठरला आहे. त्यामुळे क्वालिफायर-१च्या सामन्यासाठी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये सामना रंगणार आहे. तर, बंगळुरूच्या संघाचा पराभव झाला असला, तरी रनरेटच्या जोरावर ते प्लेऑफसाठी पात्र ठरले आहेत.
शेख झायेद मैदानावर बंगळुरूने दिल्लीला विजयासाठी १५३ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीने पृथ्वी शॉला स्वस्तात गमावले. मात्र, अजिंक्य रहाणे आणि शिखर धवनने भागिदारी रचत दिल्लीला विजयाजवळ पोहोचवले. धवनने ६ चौकारांसह ५४ तर, रहाणेने ५ चौकार आणि एका षटकारासह ६० धावा केल्या. धवनला शाहबाझ अहमदने तर रहाणेला वॉशिंग्टन सुंदरने बाद केले. मार्कस स्टॉइनिस आणि ऋषभ पंत या दोन फलंदाजांनी दिल्लीच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
तत्पूर्वी, सलामीवीर देवदत्त पडिक्कलची अर्धशतकी खेळी आणि एबी डिव्हिलियर्सच्या ३५ धावांमुळे बंगळुरूने दिल्लीसमोर २० षटकात ७ बाद १५२ धावा केल्या. नाणेफेक जिंकलेल्या दिल्ली कॅपिटल्सने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. बंगळुरूचे फलंदाज जोश फिलीप आणि पडिक्कल यांनी सलामी दिली. संघाच्या २५ धावा असताना फिलीपला कगिसो रबाडाने बाद केले. त्यानंतर पडिक्कल-कोहलीची जोडी मैदानावर स्थिरावली. २९ धावांवर असताना विराटला अश्विनने माघारी धाडले. विराट माघारी परतल्यानंतर पडिक्कलने आयपीएलमधील जादुई फॉर्म कायम राखत अर्धशतक झळकावले. त्याने ४ चौकारांसह ५० धावा केल्या. पडिक्कल बाद झाल्यावर डिव्हिलियर्सने २१ चेंडूत ३५ धावांची खेळी करत संघाला दीडशेपार धावसंख्या उभारला आली. दिल्लीकडून एनरिक नॉर्कियाने ३३ धावांत ३ तर, रबाडाने ३० धावांत २ फलंदाज बाद केले.
MATCH UPDATE :
- दिल्ली आणि बंगळुरू प्लेऑफसाठी पात्र.
- दिल्लीचा बंगळुरूवर ६ गडी राखून विजय.
- दिल्लीला विजयासाठी १२ चेंडूत १५ धावांची गरज.
- अजिंक्य ६० धावांवर बाद, सुंदरने केले बाद.
- ऋषभ पंत मैदानात.
- शाहबाझ अहमदच्या गोलंदाजीवर अय्यर ७ धावांवर बाद.
- दिल्लीला तिसरा धक्का, अय्यर बाद.
- दिल्लीला विजयासाठी २४ चेंडूत २५ धावांची गरज.
- अजिंक्य रहाणेचे २८वे आयपीएल अर्धशतक, खेळीत ५ चौकार आणि एका षटकाराचा समावेश.
- चौदा षटकानंतर दिल्लीच्या २ बाद ११५ धावा.
- श्रेयस अय्यर मैदानात.
- धवन ५४ धावांवर झेलबाद, अहमदला मिळाली विकेट.
- शिखर धवनचे अर्धशतक. खेळीत ६ चौकार.
- दिल्लीला विजयासाठी ६० चेंडूत ७२ धावांची गरज.
- दहा षटकानंतर दिल्लीच्या १ बाद ८१ धावा.
- नऊ षटकानंतर धवन ३५ तर रहाणे २७ धावांवर नाबाद.
- पाच षटकात दिल्लीच्या १ बाद ४२ धावा.
- अजिंक्य मैदानात.
- दिल्लीला पहिला धक्का, सिराजच्या गोलंदाजीवर शॉ बाद.
- पहिल्या षटकात दिल्लीच्या बिनबाद ११ धावा.
- ख्रिस मॉरिसकडून पहिले षटक.
- दिल्लीचे सलामीवीर फलंदाज मैदानात.
- २० षटकात बंगळुरूच्या ७ बाद १५२ धावा.
- सुंदर - अहमद मैदानात.
- उडाना ४ धावांवर बाद, नॉर्कियाचा तिसरा बळी.
- डिव्हिलियर्स २१ चेंडूत ३५ धावा करून धावबाद.
- दुबे १७ धावांवर बाद, रबाडाचा दुसरा बळी.
- सतरा षटकानंतर बंगळुरूच्या ४ बाद ११७ धावा.
- शिवम दुबे मैदानात.
- ख्रिस मॉरिस शून्यावर बाद.
- ख्रिस मॉरिस मैदानात.
- पडिक्कल ५० धावांवर बाद, नॉर्कियाला मिळाली विकेट.
- पंधरा षटकानंतर बंगळुरूच्या २ बाद १०३ धावा.
- पडिक्कलचे चौथे अर्धशतक.
- एबी डिव्हिलियर्स मैदानात.
- विराट कोहली २९ धावांवर बाद, अश्विनला मिळाला बळी.
- दहा षटकात बंगळुरूच्या १ बाद ६० धावा.
- नऊ षटकानंतर पडिक्कल ३१ तर विराट १२ धावांवर नाबाद.
- पाच षटकात बंगळुरूच्या १ बाद ३१ धावा.
- विराट कोहली मैदानात.
- फिलीप १२ धावांवर बाद, रबाडाने धाडले माघारी.
- पहिल्या षटकात बंगळुरूच्या बिनबाद ४ धावा.
- डॅनियल सॅम्सकडून दिल्लीसाठी पहिले षटक.
- बंगळुरूचे सलामीवीर पडिक्कल-फिलीप मैदानात.
- नाणेफेक जिंकून दिल्लीचा गोलंदाजीचा निर्णय.
- थोड्याच वेळात होणार नाणेफेक.
दिल्ली कॅपिटल्सचा संघ -
श्रेयस अय्यर (कर्णधार), अजिंक्य रहाणे, पृथ्वी शॉ, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), शिखर धवन, अक्षर पटेल, मार्कस स्टॉइनिस, कगिसो रबाडा, रविचंद्रन अश्विन, एनरिक नॉर्किया, डॅनियल सॅम्स.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ -
जोश फिलिप, देवदत्त पडिक्कल, विराट कोहली (कर्णधार), शाहबाझ अहमद, एबी डिव्हिलियर्स, शिवम दुबे, ख्रिस मॉरिस, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, इसुरु उडाना, मोहम्मद सिराज.