नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. प्रथमच पूर्णवेळ कसोटी उपकर्णधारपदी निवड झालेला रोहित शर्मा दुखापतग्रस्त झाल्याने त्याचा कसोटी संघासोबतचा दौऱ्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
टीम इंडिया सध्या प्रोटोकॉलनुसार मुंबई विमानतळाजवळ तीन दिवस अनिवार्य क्वारंटाईनमध्ये आहे आणि भारतीय संघ 16 डिसेंबर रोजी चार्टर्ड फ्लाइटने जोहान्सबर्गला जाईल. दक्षिण आफ्रिकेत पोहोचल्यानंतर खेळाडूंना स्थानिक नियमांनुसार प्रोटोकॉल अंतर्गत क्वारंटाईन करावे लागेल. पहिला कसोटी सामना २६ डिसेंबरपासून सेंच्युरियन येथे खेळवला जाणार आहे.
नेट प्रॅक्टिस दरम्यान रोहित शर्माच्या हाताला दुखापत झाली जेव्हा थ्रो-डाऊन विशेषज्ञ राघवेंद्र त्याला प्रशिक्षण देत होते. यादरम्यान राघवेंद्रचा एक उसळता थ्रो रोहितच्या ग्लोव्हजला लागला आणि त्यानंतर तो वेदनेने ओरडताना दिसला. याआधी अजिंक्य रहाणेलाही राघवेंद्रच्या थ्रोने दुखापत झाली आहे. ही दुखापत टीम इंडियासाठी आणि विशेषतः रोहित शर्मासाठी मोठा धक्का आहे. रोहितला लवकरच एक्स-रेसाठी रुग्णालयात नेले जाईल.
यानंतर दुखापतीची खरी स्थिती काय आहे हे स्पष्ट होईल. दुखापतीची परिस्थिती गंभीर असेल तर रोहितला कसोटी मालिकेतून बाहेर पडण्याशिवाय पर्याय असमार नाही, पण ही त्याच्यासाठी अत्यंत दुर्दैवी परिस्थिती असेल. कारण त्याची प्रथमच पूर्णवेळ कसोटी संघात उपकर्णधार म्हणून निवड झाली होती. या दौऱ्याबद्दल तो खूप उत्सुक होता. एक दिवस आधी रविवारी त्यांनी बीसीसीआय टीव्हीला दिलेल्या प्रदीर्घ मुलाखतीत अनेक पैलूंवर तपशीलवार भाष्य केले होते. यामध्ये त्याचा उत्साह स्पष्टपणे दिसला होता.
टीम इंडियाच्या नियोजनासाठी रोहित खूप महत्त्वाचा आहे. कारण तो या वर्षात भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. मात्र, रोहित मालिकेतून बाहेर पडल्यास त्याची जागा प्रियांक पांचाळ घेऊ शकतो. गुजरातचा प्रियांक पांचाळ सध्या दक्षिण आफ्रिकेत भारत अ संघाचा कर्णधार आहे.
हेही वाचा - कोहलीची उचलबांगडी आणि रोहित कर्णधार होण्यामागची रंजक कहाणी