इस्लामाबाद - दक्षिण आफ्रिकेचा पुरुष क्रिकेट संघ सध्या पाकिस्तान दौऱयावर आहे. दोन्ही संघांदरम्यान तीन सामन्यांची टी-ट्वेंटी मालिका खेळवण्यात आली. ही मालिका यजमान पाकिस्तानने २-१ अशी आपल्या खिशात घातली. मालिकेतील तीसरा सामना जिंकून पाकिस्तानने टी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये आपल्या १०० व्या विजयाची नोंद केली आहे. टी-ट्वेंटीमध्ये १०० विजय मिळवणारा पाकिस्तान हा पहिलाच संघ ठरला आहे.

पाकिस्तानने आतापर्यंत १६४ टी-ट्वेंटी सामने खेळले असून त्यापैकी १०० जिंकले आहेत. पाकिस्ताननंतर दुसऱ्या क्रमांकावर भारतीय संघ आहे. भारतीय संघाने आतापर्यंत १३७ सामने खेळले आहेत. त्यापैकी ८५ विजय मिळवले आहेत.
लाहोर येथील मैदानावर झालेल्या निर्णायक सामन्यात पाकिस्तानच्या संघाने दक्षिण आफ्रिकेचा चार गड्यांनी पराभव केला. सामनावीर मोहम्मद नवाझने अष्टपैलू कामगिरी करून पाकिस्तानच्या विजयात मोलाची भूमिका निभावली. प्रथम फलंदाजी करताना डेव्हिड मिलरच्या धडाकेबाज अर्धशतकामुळे आफ्रिकेने ८ गड्यांच्या बदल्यात १६४ धावा केल्या होत्या.