जोहान्सबर्ग - भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना येथील वाँडरर्स स्टेडियमवर खेळला जाणार आहे. केएल राहुलच्या नेतृत्वाखालील भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
भारतीय फलंदाजीवर आफ्रिकन गोलंदाजांचे वर्चस्व
भारतीय सलामीवीर केएल राहुल आणि मयंक अग्रवाल यांनी संघाची सुरूवात सावधपणे केली. मात्र संघाच्या 31 धावा फलकावर असताना मयंक अग्रवाल 26 धावा काढून बाद झाला. काइल वेरेनच्या गोलंदाजीवर मार्को जॅन्सनने त्याचा झेल घेतला. त्यानंतर आलेल्या चेतेश्वर पुजाराही मैदानावर टिकू शकला नाही. केवळ 3 धावा काढून तो तंबूत परतला. त्यानंतर आलेला अजिंक्य रहाणेही खाते न उघडताच माघारी फिरला. त्यामुळे संघाची अवस्था 3 बाद 49 अशी झाली होती.
हनुमा विहारीला संधीचे सोने करता आले नाही
त्यानंतर केएल राहुलच्या साथीला हनुमा विहारी दाखल झाला. विराट कोहलीच्या जागी संधी मिळालेल्या विहारीला आज आपली चमक दाखवण्याची चांगली संधी होती. राहुलसोबत त्याची जोडी जमली असतानाच हनुमा विहारीला रॅसी व्हॅन डर डुसेनने चकवले आणि रबाडाच्या हातती झेल देऊन तो 20 धावांवर बाद झाला. त्यावेळी संघाची धावसंख्या चार गडी बाद 91 अशी होती.
केएल राहूलची एकाकी खेळी
केएल राहूल कर्णदाराला साजेशी खेळी करीत स्वतःच्या नावावर अर्धशतक झळकवले. त्यानंतर मात्र तो झटपटबाद झाला. भारताची धावसंख्या 116 असताना कागिसो रबाडाच्या गोलंदाजीवर तो मार्को जॅन्सनच्या हाती झेल देऊन माघारी फिरला.
ऋषभ पंत याच्याकडून भरीव खेळीची अपेक्षा होती. परतु ऋषभ आपल्या नावावर 17 धावा असताना बाद झाला. त्यापाठोपाठ शार्दुल ठाकूरही आपले खाते न उघडताच माघारी परतला.
भारताने दोनशेचा टप्पा ओलांडला आणि डाव संपला
भारताच्यावतीने रविचंद्रन अश्विनने अखेरीस एकाकी झुंज देण्याचा प्रयत्न केला. त्याला दुसऱ्या बाजूने फारशी साथ मिळाली नाही. अखेरीस 46 धावा काढून तो तंबूत परतला. त्या अगोदर मोहम्मद शामी 9 धावा काढून बाद झाला होता. अश्विन बाद झाला तेव्हा भारताची धावसंख्या 9 बाद 187 झाली होती. जसप्रित बुमराह आणि मोहम्मद शामी यांनी शेवटच्या विकेटसाठी केलेल्या 15 धावांच्या भागीदारीमुळे भारत दोनशे धावांचा टप्पा ओलांडू शकला. जसप्रित बुमराहने नाबाद 14 धावा केल्या तर मोहम्मद शामी 1 धाव काढून बाद झाला. अशा प्रकारे भारताचा पहिला डाव 202 धावावर आटोपला.
कागिसो रबाडा आणि डुआन ऑलिव्हियर यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. तर मार्को जॅन्सनने चार गडी बाद करुन आपले वर्चस्व सिध्द केले.
पाठीच्या दुखण्यामुळे विराट कोहलीला दुसऱ्या कसोटीला मुकावे लागले आहे. त्याची जागा केएल राहुलने घेतली असून भारतीय संघ पुन्हा दुसऱ्या लढाईसाठी सज्ज झाला आहे.
नाणेफेकीच्या वेळी, भारतीय कर्णधार म्हणाला, "दुर्दैवाने विराटला पाठीच्या वरच्या बाजूला दुखापत झाली आहे. फिजिओ त्याच्यावर उपचार करत आहेत आणि आशा आहे की तो पुढच्या कसोटीत बरा होईल. आपल्या देशाचे कर्णधार बनणे हे प्रत्येक भारतीय खेळाडूचे स्वप्न असते. खरोखर या सन्माननीय आणि आव्हात्मक खेळाची वाट पाहत आहोत. आम्ही येथे काही चांगले विजय मिळवले आहेत आणि आशा आहे की आम्ही ते पुढे चालू ठेवण्याचा प्रयत्न करू. विराटच्या जागी हनुमा विहारी खेळेल. हा फक्त एक बदल संघात करण्यात आला आहे. सेंच्युरियनमध्ये आम्ही खरोखरच चांगली कामगिरी केली. एक संघ म्हणून या सामन्याबद्दल खरोखरच उत्सुक आहोत."
दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन):
डीन एल्गर (क), एडन मार्कराम, कीगन पीटरसन, रॅसी व्हॅन डर डुसेन, टेम्बा बावुमा, काइल वेरेन (डब्ल्यू), मार्को जॅन्सन, कागिसो रबाडा, केशव महाराज, डुआन ऑलिव्हियर, लुंगी एनगिडी
भारत (प्लेइंग इलेव्हन):
केएल राहुल (क), मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, ऋषभ पंत (पंत), रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शामी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज