लंडन - इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात दोन सामन्याची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. उभय संघातील मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघ इंग्लंडमध्ये दाखल झाला. या मालिकेला सुरूवात होण्याआधी यजमान इंग्लंड संघाला एक मोठा धक्का बसला आहे. त्यांचा प्रमुख वेगवान गोलंदाज न्यूझीलंडविरुद्धच्या मुकला आहे.
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरच्या दुखापतीने पुन्हा डोकं वर काढलं आहे. यामुळे तो न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतून बाहेर पडला आहे.
जोफ्रा आर्चरला भारत दौऱ्यात दुखापत झाली होती. यामुळे तो आयपीएलचा चौदावा हंगाम खेळू शकला नव्हता. आयपीएल दरम्यान, तो मायदेशी परतला आणि त्याच्यावर उपचार सुरू होते. उपचारानंतर त्याने काउंटी क्रिकेट खेळण्यास सुरूवात केली.
ससेक्सकडून खेळताना आर्चरला पुन्हा दुखापत झाली. त्यामुळे तो अखेरच्या दिवशी गोलंदाजी करू शकला नाही. आता तो न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेला मुकला असल्याची माहिती समोर येत आहे.
परंतु, असे असले तरी ईसीबीने याविषयी सांगितले की, जोफ्रा आर्चरच्या हाताला दुखापत झाली आहे. इंग्लंड आणि ससेक्सची मेडिकल टीम त्याच्या दुखापतीविषयी तपासणी करेल. या आठवड्याच्या अखेरीस मेडिकल टीमच्या सल्ला विचारात घेऊन व्यवस्थान योग्य तो निर्णय घेईल.
दरम्यान, उभय संघातील पहिला कसोटी सामना लॉडर्सवर खेळला जाणार आहे. या सामन्याला २ जूनपासून सुरूवात होणार आहे.
हेही वाचा - ऋषभ पंतने घेतला कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस
हेही वाचा - इंग्लंडचे आयपीएल खेळाडू न्यूझिलंड विरुध्दच्या कसोटीपासून राहणार वंचित