नवी दिल्ली Team India Schedule : २०२३ हे वर्ष भारतीय क्रिकेटसाठी निराशाजनक राहिलं. टीम इंडियाला एकदिवसीय विश्वचषकासह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्येही पराभवाचा सामना करावा लागला. आता २०२४ मध्ये चाहत्यांना भारतीय संघाकडून पुन्हा एकदा मोठ्या अपेक्षा असणार आहेत. यावर्षी भारतीय संघाची नजर जूनमध्ये खेळल्या जाणाऱ्या टी-२० विश्वचषकाकडे असेल.
यावर्षीचं भारतीय संघाचं प्रस्तावित वेळापत्रक : या वर्षाच्या सुरुवातीला भारतीय संघ ३ जानेवारीपासून २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना खेळणार आहे. यानंतर, भारतीय संघाला अफगाणिस्तानसोबत मायभूमीत तीन टी २० आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका खेळायची आहे. त्यानंतर भारतीय संघ जानेवारी ते मार्च दरम्यान मायभूमीतच पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे.
एप्रिल-मेमध्ये आयपीएलचा थरार : एप्रिल-मे महिन्यात भारतीय खेळाडू जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग अर्थातच आयपीएलमध्ये व्यस्त असतील. यासाठी नुकताच खेळाडूंचा लिलाव पार पडला. आयपीएलच्या माध्यमातून दरवर्षी भारतीय क्रिकेटला अनेक नवे सितारे मिळतात.
टी-२० विश्वचषकावर नजर : या वर्षी जूनमध्ये टी २० विश्वचषक खेळला जाणार आहे. अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या या विश्वचषकात २० संघ सहभागी होतील. भारतीय संघानं २००७ मध्ये पहिला टी २० विश्वचषक जिंकला होता. तेव्हापासून टीम इंडियाला एकही विश्वचषक जिंकता आलेला नाही. त्यामुळे आता या विश्वचषकात टीम इंडियाच्या कामगिरीवर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.
नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाचा दौरा : टी २० विश्वचषकानंतर भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध त्यांच्या भूमीत तीन एकदिवसीय आणि तीन टी २० सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यानंतर भारतीय संघ सप्टेंबरमध्ये बांग्लादेशसोबत मायदेशात २ कसोटी आणि ३ टी २० सामने खेळेल. यानंतर भारतीय संघ मायभूमीत न्यूझीलंडसोबत तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये ही मालिका खेळली जाईल. नोव्हेंबर ते डिसेंबर या कालावधीत भारतीय संघ ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार आहे.
हे वाचलंत का :