साउथम्पटन - जगभरातील क्रिकेटप्रेमींमध्ये उत्सुकता असलेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा भारताने दुसऱ्या दिवसाअखेर ६४.४ षटकात ३ बाद १४६ धावा केल्या आहेत. खराब प्रकाशामुळे पंचांना अनेकवेळा सामना थांबवावा लागला.
भारत उपहारापर्यंत २ बाद ६९ धावा
रोहित शर्मा आणि शुबमन गिल या जोडीने भारताला अर्धशतकी सलामी दिली. ६१ धावांवर भारताला रोहितच्या रुपाने पहिला धक्का बसला. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज काईल जेमीसनने रोहितला बाद केले. स्लीपमध्ये उभ्या असलेल्या साऊदीने रोहितचा झेल टिपला. रोहितने ६ चौकारांसह ३४ धावा केल्या. रोहित बाद झाल्यानंतर एका धावेच्या फरकाने शुबमन माघारी परतला. नील वॅग्नरने शुबमनला वॉटलिंगकरवी झेलबाद केले. शुबमनने २८ धावा केल्या. भारताने उपहारापर्यंत २ बाद ६९ धावा केल्या. यानंतर पुजारा (८) स्वस्तात बाद झाला. त्याला बोल्टने पायचित केलं. तेव्हा विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे या जोडीने भारताला शंभरी पार करून दिली. पंचांनी ६५ व्या षटकात खराब प्रकाशमानामुळे सामना थांबवला. विराट ४४ तर रहाणे २९ धावांवर नाबाद आहेत. जेमिसन, वॅग्नर आणि बोल्ट यांनी प्रत्येकी १-१ गडी बाद केला.
दरम्यान, जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात होत आहे. हा सामना साउथम्पटन येथील एजेस बाउल मैदानावर रंगला आहे. १८ जून रोजी या सामन्याला सुरूवात होणार होती. परंतु पावसामुळे सामन्याचा पहिला दिवस रद्द करण्यात आला. आज साउथम्पटनमधील आभाळ स्वच्छ असून तिथे सूर्यप्रकाशही पडला. यामुळे आजपासून सामन्याला सुरूवात झाली. परंतु सामन्याच्या ६५ व्या षटकात खराब प्रकाशामुळे सामना थांबवण्यात आला. भारताने दुसऱ्या दिवसाअखेर ३ बाद १४६ धावा केल्या आहेत.
भारत आणि न्यूझीलंड हेड टू हेड रेकॉर्ड -
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आतापर्यंत एकूण ५९ कसोटी सामने खेळवण्यात आले आहेत. यातील २१ सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवला आहे. तर न्यूझीलंडने १२ सामने जिंकले आहेत. तर २६ सामने अनिर्णीत राहिले आहेत.
- भारताची प्लेईंग इलेव्हन -
- रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रविंद्र जडेजा, आर अश्विन, इशांत शर्मा, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह.
- न्यूझीलंडची प्लेईंग इलेव्हन -
- केन विल्यमसन (कर्णधार), ट्रेंट बोल्ट, डेव्हॉन कॉन्वे, कॉलिन डी ग्रँडहोम, काईल जॅमीसन, टॉम लॅथम, हेन्री निकोलस, टिम साऊदी, रॉस टेलर, नील वॅगनर, बीजे वॉटलिंग.
हेही वाचा - WTC Final : विराट सेना मैदानात उतरण्यास सज्ज, समोर आला फोटो
हेही वाचा - WTC final: भारत विरुध्द न्यूझिलंड सामन्याच्या पहिल्या दिवसावर पाणी