लीसेस्टरशायर - चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह आणि प्रसिद्ध कृष्णा हे चार भारतीय क्रिकेटपटू लीसेस्टरशायर कौंटी क्रिकेट क्लब ( Leicestershire County Cricket Club )मधून खेळणार आहेत. कर्णधार सॅम इव्हान्सच्या नेतृत्वाखाली लीसेस्टरशायरच्या संघातून ते खेळणार आहेत. गुरुवारपासून चार दिवसीय सराव सामना ( warm-up match ) सुरू होणार आहे. भारतीय खेळाडूंना पुरेसा सराव मिळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्यावर्षी कोरोनामुळे अर्धवट राहिलेल्या पाच सामन्यांची कसोटी मालिका पूर्ण करण्यासाठी भारतीय संघ इंग्लंडला रवाना झाला आहे. तिथे १ जुलै ते ५ जुलै दरम्यान दोन्ही संघात शेवटचा कसोटी सामना (test cricket) होणार आहे. त्याशिवाय तीन वनडे आणि तीन टी२० सामने खेळवले जाणार आहेत. मात्र त्याआधी तिथे एक सराव सामान आयोजीत करण्यात आला आहे.
दोन्ही संघांकडून १३-१३ खेळाडू खेळतील - होणाऱ्या या ४ दिवसीय सराव सामन्यात दोन्ही संघांकडून १३-१३ खेळाडू खेळतील. गोलंदाजांवर जास्त ताण पडू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. एलसीसीसी हा सराव सामन्यासाठी भारतीय संघाचे स्वागत करतो आहे. टीम इंडियाचे ४ स्टार खेळाडू चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह आणि प्रसिद्ध कृष्णा आमच्या क्लबकडून खेळतील. एलसीसीसीचे कर्णधार सॅम इव्हान्स त्यांचे नेतृत्व करतील. या चार खेळाडूंना या क्लबकडून खेळण्यासाठी बीसीसीआय ( BCCI ) आणि ईसीबी ( ECC ) यांची संमती मिळाली आहे. त्यामुळे भारतीय संघातील सर्व खेळाडूंना सराव सामने खेळण्याची संधी मिळेल, असा या मागचा हेतू आहे. असे लीसेस्टरशायर काउंटी क्रिकेट क्लबने जारी निवेदनात म्हटले आहे.
भारत २-१ ने आघाडीवर - इव्हान्स, पुजारा, पंत, बुमराह आणि प्रसिद्ध यांच्या व्यतिरिक्त, एलसीसीसीमधील रेहान अहमद, सॅम बेट्स यष्टी रक्षक, नॅट बॉली, विल डेव्हिस, जॉय इव्हिसन, लुईस किम्बर, अबी सकंडे आणि रोमन वॉकरहे खेळाडू सराव सामन्यात खेळतील. इंग्लंडविरुद्ध 1 जुलै ते 5 जुलैपर्यंत हा कसोटीपूर्व एकमेव सराव सामना खेळला जाणार आहे. या कसोटी मालिकेत सध्या भारत २-१ ने आघाडीवर आहे. बुधवारी, कर्णधार रोहित शर्मा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, शुभमन गिल, हनुमा विहारी, जसप्रीत बुमराह आणि शार्दुल ठाकूर यांच्यासह इतरांनी लीसेस्टरमधील अपटॉनस्टील काउंटी मैदानावर दोन तासांहून अधिक सराव केला. दरम्यान, क्रिकबझच्या अहवालानुसार कोविड पॉझिटिव्ह झाल्यामुळे आधी फ्लाइट चुकलेला आर अश्विन इंग्लंडला रवाना झाला आहे. त्याशिवाय,नवदीप सैनी, कमलेश नागरकोटी आणि सिमरजीत सिंग यांना इंग्लंड दौऱ्यासाठी नेट बॉलर म्हणून सामील करण्यात आले आहे. सध्या सैनी आणि नगरकोटी हे सध्या संघासोबत आहेत. तर सिमरजीत सिंग लवकरच इंग्लंडमध्ये दाखल होणार आहे.
खेळाडूंची नावे - लीसेस्टरशायर संघ: सॅम्युअल इव्हान्स (कर्णधार), रेहान अहमद, सॅम्युअल बॅट्स (यष्टीरक्षक), नॅथन बॉली, विली डेव्हिस, जो इव्हिसन, लुईस किम्बर, एविडाइन स्कँद, रोमन वॉकर, चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह आणि प्रसिद्ध कृष्णा.
भारत संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, श्रीकर भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि उमेश यादव.
हेही वाचा - पाकिस्तानचा दिग्गज क्रिकेटपटू झहीर अब्बासची प्रकृती खालावली, लंडनमधील आयसीयूमध्ये दाखल