मुंबई - आपल्या पहिल्या अपत्यामुळे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली क्रिकेटपासून दूर आहे. मात्र, तो ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाला भारतातून पाठिंबा देत आहे. बॉक्सिंग डे आणि सिडनी कसोटीतील टीम इंडियाच्या कामगिरीवर विराटने संघसहकाऱ्यांचे कौतुक केले होते. आता ब्रिस्बेनमध्ये सुरू असलेल्या चौथ्या कसोटीकडेही तो लक्ष देत असल्याचे समोर आले आहे. या कसोटीच्या चौथ्या दिवशी वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दुल ठाकुर या जोडीने भारताचा डाव सांभाळला. या जोडीच्या कामगिरीवर विराटने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
विराटचे ट्विट -
या कसोटीच्या पहिल्या डावात भारताचे आघाडीचे सहा फलंदाज १८६ धावांवर माघारी परतले. तेव्हा भारतीय संघ १८३ धावांनी पिछाडीवर होता. अशा कठीण स्थितीत मराठमोळा शार्दुल ठाकुर आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी सातव्या गड्यासाठी १२३ धावांची भागीदारी रचली. याच भागीदारीच्या जोरावर भारतीय संघाला पहिल्या डावात ३३६ धावांपर्यंत मजल मारता आली. या कामगिरीनंतर विराट म्हणाला, ''शार्दुल ठाकुर आणि वॉशिंग्टन सुंदरची विश्वासाने भरलेली कामगिरी. हेच ते कसोटी क्रिकेट आहे. पदार्पणाच्या सामन्यात वॉशिंग्टनने दाखवलेली शांतता आणि तुला परत मानला रे ठाकुर!''
तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाल्यानंतर अनुभवी चेतेश्वर पुजारा (२५) आणि कर्णधार अजिंक्य रहाणे (३७) पहिल्या सत्रात बाद झाले. त्यानंतर पंत आणि मयांक अगरवाल यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण ते चांगल्या सुरुवातीनंतरही मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश ठरले. रिषभ पंत २३ तर मयांक अगरवाल ३८ धावांवर बाद झाला. भारताची अवस्था ६ बाद १८६ अशी झाली. तेव्हा भारतीय संघ २०० धावांपर्यंत मजल मारेल का? अशी शंका प्रत्येकाच्या मनात होती. पण पदार्पण करणारा सुंदर आणि दुसरा सामना खेळणाऱ्या शार्दुल ठाकुरने जबाबदारीने फलंदाजी केली.
शार्दुल ठाकुर आणि वॉशिंग्टन सुंदरचे अर्धशतक -
या दोघांनी सातव्या गड्यासाठी १२३ धावांची भागीदारी करत भारतीय संघाची धावसंख्या तीनशेपार पोहोचवली. शार्दुलने ११५ चेंडूचा सामना करताना ९ चौकार आणि दोन षटकाराच्या मदतीनं ६७ धावांची खेळी केली. तर, सुंदरने १४४ चेंडूचा सामना करताना सात चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ६२ धावांची खेळी साकारली.