नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट संघाने ब्रिस्बेन कसोटी जिंकून इतिहास रचला आहे. चौथ्या कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशी भारताने ऑस्ट्रेलियाला ३ गड्यांनी मात देत कसोटी मालिका जिंकली. भारताचा हा सार्वकालिन महान कसोटी मालिकाविजय मानला जात आहे.
या सामन्यात रिषभ पंतने १३८ चेंडूंत नाबाद ८९ धावा केल्या. तर, अनुभवी चेतेश्वर पुजारानेही २११ चेंडू खेळून काढत ५६ धावांचे योगदान दिले. गाबा कसोटी जिंकण्याबरोबरच भारतीय क्रिकेट संघाने बर्याच मोठ्या विक्रमांचीही नोंद केली आहे.
ब्रिस्बेन कसोटीत झालेले विक्रम -
- शेवटच्या दिवसाच्या खेळात भारतीय संघाने एकूण (३२५) धावा फटकावल्या. एखाद्या कसोटीच्या पाचव्या दिवशी सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये भारताला तिसरा क्रमांका मिळाला आहे. या यादीत ऑस्ट्रेलिया प्रथम असून त्यांनी १९७८च्या इंग्लंडविरुद्धच्या लीड्स कसोटीत ४०४ धावा केल्या होत्या. तर, दुसऱ्या क्रमांकावरील वेस्ट इंडिज संघाने १९८४मध्ये इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्स मैदानावर ३४४ धावा केल्या होत्या.
- या मालिकेत टीम इंडियाला पहिल्या कसोटीत पराभव पत्करावा लागला. त्यानंतर दिमाखदार कामगिरीच्या जोरावर भारताने ही कसोटी मालिका आपल्या नावावर केली. असा कारनामा करण्याची भारताची ही पाचवी वेळ होती. याआधी १९७२-७३मध्ये इंग्लंडविरुद्ध, २०००-०१मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध, त्यानंतर श्रीलंकाविरुद्ध आणि २०१६-१७मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताने कसोटी मालिका जिंकली आहे.
- ऑस्ट्रेलियामध्ये कोणत्याही संघाने पूर्ण केलेले हे तिसरे सर्वोच्च आव्हान होते. २००८-०९मध्ये दक्षिण आफ्रिकेने पर्थमध्ये ४१४ धावांचा पाठलाग केला. त्याचवेळी इंग्लंडने १९२८-१९मध्ये ३३२ धावांचे लक्ष्य गाठले होते.
- लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा हा सर्वात तिसरा मोठा विजय ठरला.
- १९८८ नंतर ऑस्ट्रेलिया संघाला प्रथमच ब्रिस्बेनमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले.
- ब्रिस्बेन मैदानावर टीम इंडियाचा हा पहिला कसोटी विजय होता.
- ब्रिस्बेनमधील कोणत्याही संघाने पूर्ण केलेले हे सर्वात मोठे लक्ष्य होते. यापूर्वी १९५१ मध्ये ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजविरुद्ध २३६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करून विजय मिळविला होता.
- चेतेश्वर पुजाराने लक्ष्याचा पाठलाग करत १९६ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. हे कसोटी क्रिकेटमधील सर्वाधिक चेंडू खेळून पूर्ण होणारे अर्धशतक ठरले.
- रिषभ पंतने त्याच्या १००० कसोटी धावा पूर्ण केल्या. यष्टिरक्षक म्हणून रिषभने २७ डावात १००० धावा पूर्ण केल्या. यापूर्वी धोनीने ३२ डावात १००० धावा केल्या होत्या.
हेही वाचा - 'गाबा'विजय : बीसीसीआयचं टीम इंडियाला ५ कोटींचं बक्षीस