सिडनी - युवा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत आणि हनुमा विहारी यांनी वैयक्तिक शतके करत भारत अ संघाला मजबूत आघाडी मिळवून दिली. ऑस्ट्रेलिया-अ विरुद्ध खेळल्या जाणार्या दुसर्या सराव सामन्यात पंतने वेगवान शतक ठोकून पहिल्या कसोटी सामन्यातील आपला दावा मजबूत केला आहे.
हेही वाचा - सचिनच्या नावावर होणार स्टेडियम...खासदार मनोज तिवारी यांचा निर्धार
भारत अ आणि ऑस्ट्रेलिया अ संघांत दुसरा सराव सामना खेळवला जात आहे. या तीन दिवसीय दिवस-रात्र सराव सामन्यात भारताने दुसऱ्या दिवसअखेरीस ४ बाद ३८६ धावा केल्या. पंतने ७३ चेंडूत १०३ तर, विहारीने १०४ धावा केल्या. पंतने ९ चौकार आणि ६ षटकार ठोकले. तर विहारीने १३ चौकार लगावले. या कामगिरीच्या जोरावर भारताने ४७२ धावांची दमदार आघाडी घेतली आहे.
पंत आणि विहारीखेरीज शुबमन गिलने ६५ आणि मयंक अग्रवालने ६१ धावा केल्या. सलामीवीर पृथ्वी शॉला फक्त तीन धावा करता आल्या. पहिल्या डावात भारताने १९४ धावा केल्या. तर, ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्याच दिवशी १०८ धावांवर गारद झाला.
संक्षिप्त धावफलक -
भारत अ - १९४ आणि ३८६/४ (हनुमा विहारी १०४ नाबाद, ऋषभ पंत १०३ नाबाद, शुबमन गिल ६५, मयंक अग्रवाल ६१, एम स्टेकेटी २/५४) वि. ऑस्ट्रेलिया अ - १०८.