अॅडलेड - ''बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेत भारताला व्हाईटवॉशचा सामना करावा लागू शकतो'', असे स्पष्ट मत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने व्यक्त केले आहे. अॅडलेड येथे खेळल्या गेलेल्या 'पिंक बॉल' कसोटीत ऑस्ट्रेलियाने भारतावर ८ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. त्यामुळे पुढच्या सामन्यात टीम इंडिया 'कमबॅक' करण्यास उत्सुक असेल. उभय संघांमधील दुसरा कसोटी सामना २६ डिसेंबरपासून मेलबर्न क्रिकेट मैदानावर (एमसीजी) रंगणार आहे.
हेही वाचा - कसोटी क्रमवारी : स्मिथच्या जवळ पोहोचला 'किंग' कोहली
पाँटिंग म्हणाला, ''दुसऱ्या कसोटीत विराट नसल्याने खूप मोठे नुकसान होणार आहे. विराटची जागा भरून काढण्यासाठी बदल करावा लागणार आहे. ऋषभ पंतला मधल्या फळीत चांगली फलंदाजी करावी लागेल. मात्र बदल करणे वेगळी गोष्ट आहे. संघात उत्साह निर्माण करावा लागेल. ऑस्ट्रेलिया आता मागे हटणार नसल्याने भारताला मानसिकदृष्ट्या विचार करावा लागेल.''
भारतीय संघाच्या अडचणीत वाढ -
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आपल्या पहिल्या अपत्याच्या जन्मासाठी भारतात परतणार आहे. त्यामुळे तो पुढील तीन सामने खेळू शकणार नाही. विराटची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा गर्भवती असून लवकरच त्यांच्या घरात लहान बाळाचे आगमन होणार आहे.