सिडनी - ऑस्ट्रेलियाच्या मधल्या फळीतील फलंदाज मार्नस लाबुशेन डेव्हिड वॉर्नरच्या अनुपस्थितीत सलामीवीरची भूमिका निभावण्यास सज्ज आहे. दुखापतीमुळे वॉर्नर मर्यादित षटकांच्या मालिकेतून म्हणजेच शेवटच्या एकदिवसीय आणि टी-२० मालिकेतून बाहेर पडला. त्याच्या जागी डार्सी शॉर्टचा संघात समावेश करण्यात आला आहे. मात्र, संघ सलामीवीर म्हणून कोणाला मैदानात उतरवणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सिडनी क्रिकेट मैदानावर भारताविरुद्ध झालेल्या दुसर्या एकदिवसीय सामन्यात क्षेत्ररक्षण करताना वॉर्नर जखमी झाला. भारतीय डावाच्या चौथ्या षटकात वॉर्नरला दुखापत झाली. शिखर धवनने खेळलेला चेंडू रोखण्यासाठी त्याने क्षेत्ररक्षण केले. या दरम्यान तो जखमी झाला. या दुखापतीनंतर तो विव्हळत होता. ऑस्ट्रेलियाच्या फिजिओने त्याला मैदानाबाहेर नेले.
हेही वाचा - वॉर्नरची दुखापत आमच्यासाठी चांगली - केएल राहुल
लाबुशेन म्हणाला, "अर्थात, जर मला सलामी देण्यास सांगितले गेले, तर मला ते करायला आवडेल. पुढील काही सामन्यांमध्ये आमचा संघ कसा खेळतो हे आपण पाहू. पण हो मी त्याचा आनंद घेईन. चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना मी परिस्थितीनुसार खेळतो.''
ऑस्ट्रेलियाने पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताविरुद्ध ३७४ तर दुसर्या सामन्यात ३८९ धावा केल्या. दुसर्या सामन्यात स्टीव्ह स्मिथने संघासाठी १०४ धावा केल्या. तर लाबुशेनने ६१ चेंडूंत ७० धावांचे योगदान दिले. तो म्हणाला, "स्टीव्ह जेव्हा मी फलंदाजीला आला, तेव्हा माझी जबाबदारी भागीदारी वाढवण्याची आणि त्याच्याबरोबर उभे राहण्याची होती. जेव्हा तो बाद झाला. तेव्हा मी आणि मॅक्सवेलने जलद धावा केल्या."