सिडनी - ऑस्ट्रेलियाचा फलंदाज विल पुकोव्स्की अॅडलेड ओव्हल येथे होणाऱ्या भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी मार्कस हॅरिसचा संघात समावेश करण्यात आला आहे. भारत अ आणि ऑस्ट्रेलिया अ यांच्यात झालेल्या सराव सामन्यात पुकोव्स्की दुखापतग्रस्त झाला.
ऑस्ट्रेलियन-अ संघाच्या डावाच्या १३व्या षटकात पुकोव्स्कीच्या डोक्याला चेंडू लागला. वेगवान गोलंदाज कार्तिक त्यागी हे षटक टाकत होता. या चेंडूनंतर तो जमिनीवर कोसळला. रिटायर्ड हर्ट झाल्यानंतर तो ड्रेसिंग रूममध्ये परतला. २२ वर्षांच्या पुकोव्स्कीने पहिल्या सामन्यात १ आणि २३ धावा केल्या. यापूर्वी तो सात-आठ वेळा जखमी झाला आहे.
हेही वाचा - वाढदिवस असताना युवराज मागतोय माफी!...जाणून घ्या कारण
त्याचबरोबर सलामीवीर डेव्हिड वॉर्नरसुद्धा पहिल्या कसोटीतून बाहेर पडला आहे. दुसर्या एकदिवसीय सामन्यात त्याला दुखापत झाली. टी-२० मालिकादेखील तो खेळू शकला नाही. विल पुकोव्स्कीची जागा घेणाऱ्या हॅरिसने २०१९मध्ये अॅशेस दरम्यान अखेरचा कसोटी सामना खेळला. त्याने ऑस्ट्रेलियाकडून एकूण ९ कसोटी सामने खेळले आहेत. त्याने शेफील्ड शील्ड हंगामात जोरदार फलंदाजी केली. व्हिक्टोरियाकडून खेळताना त्याने केवळ २ सामन्यात ११८.३३ च्या सरासरीने ३५५ धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याने दक्षिण ऑस्ट्रेलियाविरुद्ध २३९ धावांची द्विशतकी सर्वोच्च खेळी केली होती.
भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील ३ सामन्यांच्या एकदिवसीय व टी-२० मालिका पार पडल्या आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलियाने एकदिवसीय, तर भारताने टी-२० मालिका आपल्या खिशात घातली आहे. यानंतर आता सर्व क्रिकेट रसिकांचे लक्ष १७ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या ४ कसोटी सामन्यांच्या बहुप्रतिक्षित ‘बॉर्डर- गावसकर ट्रॉफी’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या मालिकेकडे आहे.