सिडनी - भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने सराव सामन्याच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलिया 'अ' संघाविरुद्ध प्रथम श्रेणी क्रिकेटमधील पहिले अर्धशतक झळकावले. बुमराहने ५७ चेंडूत ५५ धावा करत सर्वांची वाहवा मिळवली. भारताच्या ऑस्ट्रेलिया 'अ' संघाविरुद्धच्या दुसर्या सराव सामन्याला ११ डिसेंबर रोजी प्रारंभ झाला.
हेही वाचा - खुशखबर!...रोहित शर्मा फिटनेस टेस्टमध्ये पास
सामन्यात प्रथम फलंदाजी करतांना भारतीय संघाचा डाव ९ बाद १२३ अशा स्थितीत होता. मात्र त्यानंतर भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने कमाल करत अर्धशतक ठोकले. त्याच्या या अर्धशतकामुळे भारतीय संघ १९४ धावांपर्यंत पोहोचू शकला. बुमराहने शानदार फलंदाजी करत सहा चौकार आणि दोन षटकार लगावले. बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनी दहाव्या विकेटसाठी ७१ धावांची भागीदारी केली.
भारताला ८६ धावांची आघाडी -
भारत आणि ऑस्ट्रेलिया अ संघादरम्यान सुरू असलेल्या सराव कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात भारताला ८६ धावांची आघाडी मिळाली. भारताच्या जलदगती माऱ्यासमोर कांगारूंची भंबेरी उडाल्याचे पाहायला मिळाले. भारताने पहिल्या डावात दिलेल्या १९४ धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया संघ १०८ धावांवर सर्वबाद झाला. विशेष म्हणजे पहिल्याच दिवसात दोन्ही संघांचे सर्व गडी बाद झाल्याने एकाच दिवसात एकूण २० फलंदाज बाद झाले.
मोहम्मद शमी, नवदीप सैनीच्या माऱ्यासमोर कांगारू सैरभैर झाले. या दोघांनी प्रत्येकी तीन बळी घेत ऑस्ट्रेलियन फलंदाजीचे कंबरडे मोडले. त्यांना जसप्रीत बुमराह आणि नवख्या मोहम्मद सिराजने चांगली साथ दिली. बुमराहने दोन तर सिराजने एक बळी घेतला.