कॅनबेरा - मानुका ओव्हलवर रंगलेल्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर १३ धावांनी विजय मिळवला. भारताच्या ३०३ धावांच्या लक्ष्याचा पाठवलाग करताना यजमान संघ २८९ धावांत गारद झाला. हा सामना गमावला असला तरी, ऑस्ट्रेलियाने २-१ अशा फरकाने ही तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आपल्या नावावर केली. शेवटच्या सामन्यासाठी हार्दिक पांड्याला सामनावीर, तर स्टीव्ह स्मिथला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
भारताच्या ३०३ धावांच्या आव्हाना पाठलाग करताना यजमान ऑस्ट्रेलियाने सलामीवीर मार्नस लाबुशेनला लवकर गमावले. भारताकडून पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या टी. नटराजने लाबुशेनचा वैयक्तिक ७ धावांवर त्रिफळा उद्ध्वस्त केला. या मालिकेत तुफान फॉर्मात असलेला स्टीव्ह स्मिथने लाबुशेनची जागा घेतली. सर्वांच्या नजरा खिळलेल्या स्मिथने या सामन्यात मात्र निराशा केली. शार्दुल ठाकुरच्या गोलंदाजीवर तोसुद्धा ७ धावांवर बाद झाला. त्यानंतर मोझेस हेन्रिक्स (२२) आणि कॅमेरॉन ग्रीन (२१) यांनी धावा जमवल्या. दुसऱ्या बाजुला कर्णधार आरोन फिंच ठाण मांडून उभा होता. मात्र, रवींद्र जडेजाने त्याला धवनकरवी झेलबाद केले. फिंचने ७ चौकार आणि ३ षटकारांसह ७५ धावा केल्या.
हेही वाचा - किंग खानने विकत घेतला नवीन क्रिकेट संघ
त्यानंतर ग्लेन मॅक्सवेलने भारतीय गोलंदाजांना हैराण केले. त्याने आक्रमक फलंदाजी करत चेंडू आणि आवश्यक धावांचा फरक कमी करण्याचा प्रयत्न केला. त्याला ऍश्टन अगरची साथ लाभली. मॅक्सवेलने ३८ चेंडूत ३ चौकार आणि ४ षटकारांसह ५९ धावा केल्या. बुमराहने मॅक्सवेलच्या दांड्या गुल करत ऑस्ट्रेलियाला विजयापासून दूर ठेवले. भारताकडून शार्दुल ठाकुरने ३ आणि बुमराह आणि नटराजनने प्रत्येकी २ बळी घेतले. तर, कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा यांना प्रत्येकी एक बळी घेता आला.
शुबमन गिलला सलामीला पाठवले -
तत्पूर्वी, चार फलंदाजांच्या अर्धशतकांच्या जोरावर टीम इंडियाने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियासमोर ५० षटकात ५ बाद ३०२ धावा केल्या. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेल्या विराटने संघात महत्त्वपूर्ण बदल केले. मयंक अग्रवालला मागे ठेऊन विराटने सलामी फलंदाजीसाठी शिखर धवन आणि युवा शुबमन गिलला मैदानात पाठवले. वैयक्तिक १६ धावांवर असताना धवन झेल देऊन माघारी परतला. आज संधी मिळालेल्या सीन ऍबॉटने त्याला बाद केले. त्यानंतर विराट कोहली आणि गिलने अर्धशतकी भागिदारी धावफलकावर लावली. फिरकीपटू ऍश्टन अगरने ३३ धावांवर खेळणाऱ्या गिलला पायचित पकडले. त्यानंतर आलेले श्रेयस अय्यर आणि लोकेश राहुलही चांगल्या धावा जमवण्यास अयशस्वी ठरले. दुसऱ्या बाजूला खेळणारा विराटही ५ चौकारांसह ६३ धावा काढून बाद झाला. त्याला जोश हेझलवुडने बाद केले.
वरची फळी गारद झाल्यानंतर हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजाने मोर्चा सांभाळला. हार्दिकने ७ चौकार आणि एका षटकारासह नाबाद ९२ तर जडेजाने ५ चौकार आणि ३ षटकारांसह ६६ धावा ठोकल्या. या दोघांच्या दीडशतकी भागिदारी करत संघाला तीनशेपार पोहोचवले. यजमान संघाकडून अगरने सर्वाधिक २ बळी घेतले.
संघांत बदल -
आजच्या सामन्यात भारताकडून वेगवान गोलंदाज टी. नटराजन तर ऑस्ट्रेलियाकडून कॅमेरॉन ग्रीनने एकदिवसीय पदार्पण केले. टीम इंडियाने ११ जणांच्या संघात या सामन्यासाठी अनेक बदल केले. मयंक अग्रवाल ऐवजी सलामीला शुबमन गिलला संधी देण्यात आली. तर, युजवेंद्र चहल ऐवजी कुलदीप यादवला फिरकीपटू म्हणून संधी मिळाली आहे. तसेच शार्दुल ठाकुरलाही या सामन्यासाठी संधी मिळाली आहे. तर, नवदीप सैनी आणि मोहम्मद शमी अंतिम ११ मधून बाहेर गेले.