सिडनी - विजयासाठी शेवटच्या षटकात १४ धावांचे आव्हान... हार्दिक पांड्या आणि श्रेयस अय्यरची जोडी खेळपट्टीवर... ऑस्ट्रेलियाकडून पदार्पणवीर गोलंदाज डॅनियल सॅम्सच्या हातात चेंडू... पहिल्या चेंडूवर दोन धावा... दुसऱ्या चेंडूवर पांड्याच्या बॅटमधून खणखणीत षटकार... विजयासाठी ४ चेंडूत ६ धावांची गरज... चौथ्या चेंडूवर पांड्याकडून उत्तुंग षटकार... सामन्यात भारताचा तीन चेंडू आणि सहा गडी राखून विजय.
हा थरार भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनीच्या मैदानावर झालेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात पाहायला मिळाला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला विजयासाठी १९५ धावांचे कठीण आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर शिखर धवन आणि लोकेश राहुल यांनी चांगली सुरुवात केली. या दोघांनी पहिल्या गड्यासाठी ५६ धावांची भागिदारी रचली. अँड्र्यू टायने राहुलला ३० धावांवर बाद करत ऑस्ट्रेलियाला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर शिखरने विराट कोहलीला हाताशी घेत अर्धशतक साजरे केले. त्याने आपल्या खेळीत ३६ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारासंह ५२ धावा केल्या. फिरकीपटू अॅडम झम्पाच्या गोलंदाजीवर शिखर झेलबाद झाला.
धावांचा पाठलाग करण्यात पटाईत असलेल्या विराटने २४ चेंडूत ४० धावा करत विजयात महत्त्वाचा वाटा उचलला. आजच्या सामन्यात पदार्पण केलेला डॅनियल सॅम्सने विराटला बाद केले. विराट बाद झाल्यानंतर हार्दिक पांड्या आणि श्रेयस अय्यरने विजयावर शिक्कामोर्तब केले. हार्दिकने २२ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकार लगावत नाबाद ४२ धावांची खेळी केली. अय्यर १२ धावांवर नाबाद राहिला. हार्दिकला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. या विजयामुळे टीम इंडियाने टी-२० मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.
वेडच्या अर्धशतकामुळे ऑस्ट्रेलियाचे भारताला कठीण आव्हान -
तत्पूर्वी, कर्णधार मॅथ्यू वेडच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या टी-२० सामन्यात भारतासमोर २० षटकात ५ बाद १९४ धावा केल्या. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकत यजमान संघाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. ऑस्ट्रेलियाने आपल्या डावाची सुरुवात चांगली केली. दुखापतग्रस्त आरोन फिंचच्या बदली कर्णधारपद सांभाळत असलेल्या मॅथ्यू वेड आणि डार्सी शॉर्ट यांनी ४७ धावांची सलामी दिली. वेडने पहिल्या षटकापासून भारताच्या गोलंदाजांना हैराण केले. शॉर्ट ९ धावा करून बाद झाला. नटराजनने त्याला तंबूत पाठवले. आत्मविश्वासाने फलंदाजी करणाऱ्या वेडने ३२ चेंडूंचा सामना करत ५८ धावा कुटल्या. त्याने या खेळीत तब्बल १० चौकार आणि एक षटकार ठोकला. वेड मोठी धावसंख्या उभारणार असे वाटत असताना तो धावबाद झाला.
वेडनंतर स्टीव्ह स्मिथ आणि मॅक्सवेलने डाव सांभाळला. मॅक्सवेल १३ चेंडूत २२ धावा करून बाद झाला. त्यानंतर मोझेस हेन्रिक्स आणि स्मिथने भारतीय गोलंदाजांवर आक्रमण केले. मोठा फटका खेळण्याच्या नादात स्मिथ ४६ धावांवर माघारी परतला. स्मिथने आपल्या खेळीत २ षटकार आणि ३ चौकार लगावले. तर, हेन्रिक्सने २६ धावांचे योगदान दिले. भारताकडून नटराजनने ४ षटकात २० धावा देत सर्वाधिक २ बळी घेतले. फिरकीपटू युझवेंद्र चहलच्या ४ षटकात ५१ धावा फटकावण्यात आल्या.
हेही वाचा - न्यूझीलंडचा पहिल्या कसोटीत सहज विजय, केन विल्यम्सन सामनावीर