अॅडलेड - भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे. पहिला सामना अॅडलेड मैदानावर दिवस-रात्र स्वरुपात खेळवण्यात येत असून भारताचा पहिला डाव २४४ धावांवर आटोपला आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी अवघ्या ११ धावा करत भारत सर्वबाद झाला. मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स या ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी केलेल्या तिखट माऱ्यासमोर भारतीय संघाने गुडघे टेकले.
हेही वाचा - मोहम्मद आमिरचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला 'गुडबाय'
कर्णधार विराट कोहलीने भारताकडून सर्वाधिक धावा केल्या. त्याने १८० चेंडूत ७४ धावा केल्या. त्याच्या खेळीत ८ चौकारांचा समावेश होता. तर, दुसऱ्या दिवशी रविचंद्रन अश्विनच्या (१५) रुपात भारताने पहिली विकेट गमावली. त्याला कमिन्सने बाद केले. तर, स्टार्कने वृध्दिमान साहाला (९) बाद केले. स्टार्कच्या चेंडूवर मोठा शॉट मारण्याच्या प्रयत्नात उमेश यादव (६) मॅथ्यू वेडकरवी झेलबाद झाला. कमिन्सने शमीला बाऊन्सर टाकून भारतीय डाव संपवला. ऑस्ट्रेलियाकडून स्टार्कने चार, कमिन्सने तीन गडी बाद केले. जोश हेजलवुड, नाथन लायन यांना प्रत्येकी एक गडी मिळाला.
नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय -
यापूर्वी भारतीय संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या दिवसअखेर संघाने ६ फलंदाज गमावत २३३ धावा केल्या होत्या. यामध्ये कर्णधार विराट कोहलीच्या महत्त्वपूर्ण ७४ धावांचा समावेश आहेत. सोबतच चेतेश्वर पुजारा (४३) आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणेने (४२) धावांचे योगदान दिले. याव्यतिरिक्त इतर फलंदाजांना २० धावांचा आकडाही पार करता आला नाही.