नवी दिल्ली - ऑस्ट्रेलियाविरुद्धची बॉर्डर-गावसकर कसोटी मालिका जिंकून भारताने सर्वांची वाहवा मिळवली. अखेरच्या कसोटी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा ३ गडी राखून पराभव केला. ब्रिस्बेनमधील गाबा आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या ऐतिहासिक विजयानंतर भारतीय क्रिकेट संघाचे सर्व बाजूंनी कौतुक होत आहे. आता पाकिस्तानच्या माजी खेळाडूंनीही टीम इंडियाचे कौतुक केले आहे.
पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम अक्रमने भारतीय संघाचे अभिनंदन केले आहे. "अविश्वसनीय कसोटी आणि भारतासाठी मालिकाविजय. इतक्या धाडसी, साहसी आणि मजबूत आशियाई संघासाठी यापेक्षा कठोर दौरा मी पाहिलेला नाही. कोणताही भेदभाव संघाला रोखू शकला नाही. स्टार क्रिकेटपटूंची दुखापत, ३६ धावांवर सर्वबाद, सर्वांसाठी प्रेरणादायी. ग्रेट भारत'', असे अक्रम म्हणाला.
माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीनेही भारताच्या विजयानंतर ट्विट केले आहे. "भारतीय संघाची अविश्वसनीय कामगिरी. इतक्या दुखापतीनंतर टीम इंडियाने जबरदस्त विजय मिळविला, भारतीय संघाचे अभिनंदन. ही मालिका दीर्घकाळ स्मरणात राहील."
रावळपिंडी एक्स्प्रेस नावाने ओळखला जाणारा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने लिहिले की, मालिकेत ३६ धावांवर बाद होऊन ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर मालिका जिंकणे, वा. तर, कामरान अकमल आपल्या ट्विटमध्ये म्हणाला की, भारतीय संघाचा हा ऐतिहासिक विजय कायम लक्षात राहील. कर्णधार अजिंक्य रहाणे, शुबमन गिल, रिषभ पंत, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकुर, चेतेश्वर पुजारा, वॉशिंग्टन सुंदर यांनी आश्चर्यकारक कामगिरी केली आहे.
हेही वाचा - धोनीच्या संघातून बाहेर पडला वर्ल्डकप विजेता खेळाडू