मेलबर्न - भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघांमधील बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचे दिवंगत क्रिकेटपटू डीन जोन्स यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. मेलबर्न क्रिकेट मैदान जोन्स यांचे होम ग्राऊंड आहे. त्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाने जोन्स यांचे स्मरण करण्याचा निर्णय घेतला.
हेही वाचा - भारत वि. ऑस्ट्रेलिया : बॉक्सिंग-डे आणि १००वा कसोटी सामना
या सामन्यादरम्यान जोन्स यांच्या स्मरणार्थ बॅनर लावण्यात आले होते. हे बॅनर संपूर्ण सामन्यात स्टॅन्डमध्ये राहणार आहेत. यूएईमध्ये पार पडलेल्या इंडियन प्रिमियर लीगसाठी समालोचक म्हणून त्यांनी करार केला होता. त्याच पार्श्वभूमीवर ते मुंबईत आले होते. मुंबईत त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि यात त्यांचे निधन झाले.
डीन जोन्स यांची कारकीर्द -
मेलबर्न येथे डीन जोन्स यांचा जन्म झाला होता. त्यांनी ऑस्ट्रेलियाकडून ५२ कसोटी सामने खेळले आहेत. यात त्यांनी ४६.५५च्या सरासरीने ३ हजार ६३१ धावा केल्या आहेत. त्यामध्ये २१६ ही त्यांची सर्वाधिक धावसंख्या आहेत. यात ११ शतकांचा समावेश आहे. जोन्स यांनी १६४ एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले आहे. यात त्यांनी ४४.६१च्या सरासरीने ७ शतके आणि ४६ अर्धशतकांसह ६ हजार ६८ धावा केल्या आहेत.