मेलबर्न - ऑस्ट्रेलियाचा डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने रविवारी कसोटी क्रिकेटमध्ये २५० बळी पूर्ण केले आहेत. मेलबर्न क्रिकेट मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान दुसरा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी रिषभ पंतला बाद करत स्टार्कने हा विक्रम नोंदवला.
हेही वाचा - ''....नाहीतर कायदेशीर कारवाई होईल'', माजी क्रिकेटपटू बिशनसिंग बेदींची डीडीसीएला इशारा
आपल्या कारकीर्दीतील ५९व्या कसोटी सामन्यात स्टार्कने २५० बळी पूर्ण केले आहेत. स्टार्कने सलामीवीर मयंक अग्रवालला शून्यावर बाद करत भारताला पहिला धक्का दिला. त्याने आता ऑस्ट्रेलियाच्या रिची बेनो यांना मागे टाकले आहे. बेनो यांच्या नावावर २४८ कसोटी बळींची नोंद आहे.
ऑस्ट्रेलियाकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूंमध्ये शेन वॉर्न अव्वल स्थानी आहे. कसोटीत त्याने ७०८ बळी घेतले आहेत. त्याच्यापाठोपाठ ग्लेन मॅकग्रा (५६३), नॅथन लायन (३९२), डेनिस लिली (३५५), मिचेल जॉन्सन (३१३), ब्रेट ली (३१०), क्रेग मॅकडर्मॉट (२९१), जेसन गिलेस्पी (२५९) आणि मिचेल स्टार्क (२५०) हे गोलंदाज आहेत.
ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात १९५ धावा -
भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात १९५ धावांमध्ये गुंडाळत आश्वासक सुरुवात केली. दुसऱ्या सत्रात लाबुशेन आणि ट्रॅविस हेड जोडीने चौथ्या गड्यासाठी ८६ धावांची भागादीरी केली. जसप्रीत बुमराह ४ आणि रविचंद्रन अश्विनने ३ गडी बाद करत ऑस्ट्रेलियाच्या डावाला खिंडार पाडले. त्यांना पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या मोहम्मद सिराजने २ गडी बाद करत मोलाची साथ दिली.