सिडनी - ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेल्या टीम इंडियाला पहिल्या एकदिवसीय सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाकडून ६६ धावांची पराभव पत्करावा लागला. कांगारूंच्या ३७५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ ५० षटकांत ८ बाद ३०८ धावांपर्यंत पोहोचू शकला. हार्दिक पांड्या आणि शिखर धवनची अर्धशतकी खेळी ऑस्ट्रेलियाच्या विशाल धावांच्या डोंगरापुढे कमी पडली. संघासाठी तडाखेबंद शतक ठोकणाऱ्या स्टीव्ह स्मिथला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
-
Update: Australia have won the toss in the first ODI and have opted to bat first. #AUSvIND pic.twitter.com/YbYFN34zMu
— BCCI (@BCCI) November 27, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Update: Australia have won the toss in the first ODI and have opted to bat first. #AUSvIND pic.twitter.com/YbYFN34zMu
— BCCI (@BCCI) November 27, 2020Update: Australia have won the toss in the first ODI and have opted to bat first. #AUSvIND pic.twitter.com/YbYFN34zMu
— BCCI (@BCCI) November 27, 2020
ऑस्ट्रेलियाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी भारताकडून शिखर धवन आणि मयंक अग्रवाल यांनी डावाची सुरुवात केली. या दोघांनी ५३ धावांची सलामी दिली. वेगवान गोलंदाज जोश हेझलवुडने मयंकला २२ धावांवर बाद करत भारताला पहिला धक्का दिला. त्यानंतर आलेला कर्णधार विराट कोहली २१ तर, मुंबईकर श्रेयस अय्यर २ धावांवर माघारी परतला. हेझलवुडने या दोघांना बाद केले. आयपीएलमध्ये तुफान फॉर्मात असलेला लोकेश राहुलही मोठी धावसंख्या उभारू शकला नाही. फिरकीपटू अॅडम झम्पाने त्याला स्मिथकरवी झेलबाद केले. स्टार फलंदाज बाद झाल्यामुळे संघाची अवस्था ४ बाद १०१ अशी झाली.
पांड्या-धवन मैदानावर स्थिरावले -
यजमान संघ भारताला लवकर गुंडाळणार असे वाटत असताना हार्दिक पांड्या आणि शिखर धवनची जोडी मैदानावर स्थिरावली. या जोडीने संयमी खेळी करत डावाला आकार दिला. शिखरने १० चौकारांसह ७४ तर, हार्दिकने ७ चौकार आणि ४ षटकारांसह ९० धावा टोलवल्या. हार्दिकने अर्धशतकानंतर आक्रमक फलंदाजाचे रूप धारण केले. मात्र, शिखर बाद झाल्यानंतर चेंडू आणि आवश्यक धावांचे अंतर वाढले. मोठा फटका खेळण्याच्या नादात हार्दिक झम्पाच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. यानंतर भारताच्या रवींद्र जडेजा (२५), नवदीप सैनी (२९), मोहम्मद शमी (१३) या तळाच्या फलंदाजांनी ऑस्ट्रेलियाचा विजय लांबवला. ऑस्ट्रेलियाकडून हेझलवुडने ५५ धावांत ३ तर, झम्पाने ५४ धावांत ४ बळी घेतले.
नाणेफेकीचा कौल ऑस्ट्रेलियाच्या बाजूने -
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकलेल्या ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार आरोन फिंच आणि स्टीव्ह स्मिथच्या वादळी शतकांमुळे ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ५० षटकांत ६ बाद ३७४ धावांचा डोंगर उभारला. फिंचने डेव्हिड वॉर्नरला साथीला घेत फलंदाजीला सुरुवात केली. वॉर्नर आणि फिंचने सुरुवातीला संयमी नंतर आक्रमक पवित्रा धारण करत संघाच्या धावसंख्येला आकार दिला. पॉवरप्लेच्या षटकात पुन्हा एकदा भारतीय गोलंदाज अपयशी ठरले. या दहा षटकात ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांनी ५१ धावा केल्या. तर, पहिल्या गड्यासाठी १५६ धावा ठोकल्या. डेव्हिड वॉर्नरने ७६ चेंडूत ६ चौकारांच्या मदतीने ६९ धावा केल्या. वॉर्नरला यष्टीरक्षक राहुलकरवी झेलबाद करत मोहम्मद शमीने यजमानांना पहिला हादरा दिला.
स्टीव्ह स्मिथ भारतावर बरसला -
पहिला गडी बाद झाल्यानंतर फिंचसोबत स्टीव्ह स्मिथ मैदानावर स्थिरावला. या दोघांनी शतकी भागिदारी रचली. फिंचने ९ चौकार आणि २ षटकारांसह ११४ धावा केल्या. तर, स्मिथने डावाच्या शेवटच्या षटकापर्यंत टिकून राहत आक्रमक फलंदाजी केली. शेवटच्या षटकाचे तीन चेंडू बाकी असताना शमीने स्मिथच्या दांड्या गुल केल्या. स्मिथने ६६ चेंडूत १ चौकार आणि ४ षटकार लगावत १०५ धावा केल्या. स्मिथ बाद झाल्यानंतर आयपीएलमध्ये अपयशी ठरलेला ग्लेन मॅक्सवेल भारताच्या गोलंदाजांवर तुटून पडला. त्याने १९ चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकारांसह ४५ धावा केल्या. त्याच्या झटपट खेळीमुळे ऑस्ट्रेलियाला साडेतीनशेचा टप्पा ओलांडता आला. भारताकडून मोहम्मद शमीने ५९ धावांत ३ बळी घेतले. तर, बुमराह, सैनी आणि चहलला प्रत्येकी एक बळी घेता आला.