अॅडलेड - दुसऱ्या दिवशी रविचंद्रन अश्विन आणि उमेश यादवच्या गोलंदाजीने कमाल दाखवल्याने ऑस्ट्रेलियाचा संघ १९१ धावांवरच आटोपला. मात्र, दुसऱ्या डावातही भारताची खराब सुरुवात झाली. पहिल्या डावात शून्यावर त्रिफळाचित झालेला सलामीवीर पृथ्वी शॉ आजही जेमतेम ४ धावा करून बाद दाखल झाला. पुन्हा त्याला पॅट कमिन्सनेच तंबूचा रस्ता दाखवला. दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा भारताच्या १ बाद ९ धावा झाल्या होत्या.
भारताने पहिल्या डावात दिलेल्या २४५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संघ १९१ धावांवरच गुंडाळला. त्यामुळे भारताला ५४ धावांची आघाडी मिळाली. कर्णधार टीम पेन (नाबाद ७३ धावा) आणि मार्नस लबुसॅग्गेन (४७ धावा) या दोघांचा अपवाद वगळता भारतीय गोलंदाजीसमोर अन्य कांगारू टिकाव धरू शकले नाहीत. ऑस्ट्रेलियाचे सहा खेळाडू दुहेरी धावसंख्याही करू शकले नाही. भारताकडून फिरकी गोलंदाज आर.अश्विनने सर्वाधिक चार गडी बाद केले. जलदगती गोलंदाज उमेश यादवने तीन तर जसप्रीत बुमराहने दोन गडी बाद केले.
तत्पूर्वी, भारताने ६ बाद २३३ धावांपासून पुढे खेळण्यास सुरुवात केली. मात्र, स्टार्क आणि कमिन्सच्या माऱ्यासमोर एकाही फलंदाजाला तग धरता आला नाही. त्यामुळे भारताचा पहिला डाव २४४ धावात संपुष्टात आला. आज भारताला फक्त ४ षटकेच खेळता आली. आर. अश्विन १५ धावांवर तर वृद्धीमान साहा ९ धावांवर बाद झाला. या दोघांना आपल्या कालच्या धावांमध्ये आज एकही धाव जोडता आली नाही. त्यानंतर तळातील फलंदाजांनी आक्रमक फटके मारत काही धावा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्टार्क आणि कमिन्स या जोडीने भारताला जास्त धावा करू दिल्या नाही. स्टार्कने उमेश यादवला आणि कमिन्सने शमीला बाद करत भारताचा डाव २४४ धावात संपुष्टात आणला.