ब्रिस्बेन - ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात भारताचे आघाडीचे ६ फलंदाज १८६ धावांवर माघारी परतले. तेव्हा भारतीय संघ १८३ धावांनी पिछाडीवर होता. अशा कठीण स्थितीत मराठमोळा शार्दुल ठाकुर आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी संघाला सावरले. शार्दुलने ६७ धावांची खेळी केली. तर, वॉशिंग्टन सुंदरने ६२ धावांची खेळी साकारत एका खास विक्रमाला गवसणी घातली.
हेही वाचा - मराठमोळ्या शार्दुलची ब्रिस्बेनमध्ये चमकदार कामगिरी
भारताकडून पदार्पणाच्या कसोटी सामन्यात ३ किंवा त्याहून अधिक बळी घेण्याशिवाय अर्धशतक झळकावणारा सुंदर दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. सुंदरने ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात ३ फलंदाजांना बाद केले आणि त्यानंतर फलंदाजीत शानदार अर्धशतक झळकावले.
तत्पूर्वी, अशी कामगिरी भारतासाठी १९४७-४८च्या मालिकेतील कसोटी सामन्यात घडली होती. स्वतंत्र भारताचा क्रिकेट संघ पहिल्यांदा ऑस्ट्रेलिया दौर्यावर गेला होता. तेव्हा दत्तू फडकर यांनी सिडनी कसोटी सामन्यात पदार्पण केले. फडकर यांनी ५१ धावांची खेळी केली. शिवाय, त्यांनी गोलंदाजीत १० षटके टाकत १४ धावांत ३ बळी घेतले होते. या षटकात त्यांनी २ निर्धाव षटके टाकली होती.
आता सुंदरने ७२ वर्षानंतर या विक्रमाची पुनरावृत्ती केली. ब्रिस्बेनमध्ये अर्धशतक झळकावण्याव्यतिरिक्त सुंदरने ८९ धावांत ३ बळी घेतले. यात स्टीव्हन स्मिथच्या विकेटचा समावेश आहे.