मेलबर्न - भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर फलंदाज स्मृती मंधानाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका सुरू होण्यापूर्वी प्रतिक्रिया दिली आहे. मागील वर्षी टी-20 विश्वकरंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून भारताचा पराभव झाला होता. या पराभवानंतर भारतीय संघात सुधारणा झाल्याचे स्मृती मंधानाने सांगितलं. आगामी क्रिकेट मालिकेत भारतीय संघ यजमान ऑस्ट्रेलिया संघाला कडवी टक्कर देईल, असे देखील स्मृतीने म्हटलं आहे. दरम्यान, उभय संघात 3 एकदिवसीय, एक डे नाइट कसोटी सामना आणि 3 टी-20 सामन्याची मालिका खेळवण्यात येणार आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलियाचा महिला संघ 2020 मध्ये टी-20 विश्वकरंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आमने-सामने झाले होते. ऑस्ट्रेलियाने या सामन्यात भारताचा 85 धावांनी पराभव करत विश्वकरंडक जिंकला होता. द स्कूप पॉडकास्टसोबत बोलताना स्मृती मंधाना म्हणाली की, ऑस्ट्रेलियाविरुद्ध विश्वकरंडक फायनलमधील पराभवानंतर भारतीय संघात सुधारणा झाली आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पोहोचलेल्या भारतीय महिला क्रिकेट संघाने 14 दिवसांचा निर्धारित क्वारंटाइन कालावधी पूर्ण केला आहे. स्मृती मंधाना पुढे म्हणाली, टी-20 विश्वकरंडक स्पर्धेनंतर कोविड19 एक मोठा ब्रेक होता. या काळात खेळाडूंना खेळाच्या बाबतीत अधिक समजण्यासाठीची संधी मिळाली. जी वैयक्तिक कमी होती त्यावर मार्ग काढत त्यांनी चांगली वापसी केली. कोरोना ब्रेकनंतर भारतीय टीम आता हळूहळू क्रिकेट खेळण्याच्या लयीत वापसी करत आहे.
संपूर्ण संघाने आपल्या फिटनेस आणि कौशल्यावर काम केले. आम्ही सतत सामना खेळण्याच्या लयीत येत आहोत. मागील पाच-सहा महिन्यापासून आम्ही क्रिकेट खेळत आहोत. आशा आहे की, आगामी ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका चांगली होईल, असे देखील स्मृती मंधाना म्हणाली.
भारतीय महिला संघाने जून-जुलै महिन्यात इंग्लंडचा दौरा केला होता. यानंतर आता भारतीय महिला संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पोहोचला आहे. या दौऱ्याआधी भारतीय महिला संघातील हरमनप्रीत कौर, शेफाली वर्मा, स्मृती मंधाना आणि जेमिमा राँड्रिग्ज यांनी इंग्लंडमधील द हंड्रेड स्पर्धेत भाग घेतला होता.
हेही वाचा - जसप्रीत बुमराहला मागे टाकत जो रूटने जिंकला आयसीसी प्लेयर ऑफ द मंथचा पुरस्कार
हेही वाचा - IPL 2021: मँचेस्टर कसोटी रद्द झाल्यानंतर विराट कोहलीची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...