कोलंबो - भारतीय संघाने श्रीलंकाविरुद्धच्या तीन सामन्याच्या एकदिवसीय मालिकेत 2-0 ने विजयी आघाडी घेतली आहे. भारताने पहिला सामना ७ गडी राखून जिंकला. तर दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने ३ गडी राखून श्रीलंकेवर विजय साकारला. दुसऱ्या सामन्यानंतर श्रीलंका संघाचे प्रशिक्षक मिकी ऑर्थर आणि कर्णधार दासुन शनाका यांचे भांडण झाल्याचे पाहायला मिळाले. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
श्रीलंका संघाने दुसर्या एकदिवसीय सामन्यात मजबूत पकड निर्माण केली होती. श्रीलंकेचा विजय जवळपास निश्चित मानला जात होता. परंतु महत्त्वपूर्ण प्रसंगी झालेल्या चुकांमुळे यजमानांना पराभवाला सामोरे जावे लागले. दुसरीकडे दीपक चहरने भारताला अशक्यप्राय वाटणारा विजय मिळवून दिला.
सामना संपल्यानंतर मिकी आर्थर आणि कर्णधार दासुन शनाका यांच्यात वाद झाल्याचे पाहायला मिळाले. श्रीलंकेचा माजी दिग्गज खेळाडू रसेल अर्नोल्डनेही मिकी आर्थर यांच्या या वर्तनावर भाष्य केले आहे. त्याने, प्रशिक्षक आणि कर्णधार यांच्यात संभाषण मैदानावर नसावे, ड्रेसिंग रूममध्ये असावे, असे ट्विट करत म्हटलं आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत काय आहे?
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दासुन शनाका आणि मिकी आर्थर एका गोष्टीवर जोरदार वाद घालताना पाहायला मिळत आहेत. आर्थर कर्णधाराला कशाबद्दल तरी बोलताना दिसले, तर दासुन शनाका त्यांना त्याच्या बाजूने पटवून देण्याचा प्रयत्न करताना दिसला.
तुला शेवटपर्यंत खेळायचं आहे
श्रीलंका संघाने दिलेल्या 276 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना एकवेळ भारतीय संघाची अवस्था 193 वर 7 अशी झाली होती. भारतीय संघाला विजयासाठी आणखी 83 धावांची गरज होती आणि फक्त 3 गडी शिल्लक होते. अशात दीपक चहरने फटकेबाजी करण्यास सुरूवात केली. तेव्हा भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड ड्रेसिंग रूममधून बाहेर आले आणि त्यांनी राहुल चहरच्या हस्ते दीपक चहरला एक मॅजेस दिला. तुला शेवटपर्यंत खेळायचंय, सगळे चेंडू खेळून काढ, असा तो मॅसेज होता. द्रविडने सांगितल्याप्रमाणे दीपक चहरने अखेरपर्यंत मैदानात तळ ठोकत भारताला अशक्यप्राय वाटणारा विजय मिळवून दिला.
हेही वाचा - India and Sri Lanka : तीन गडी राखून भारताचा श्रीलंकेवर विजय
हेही वाचा - IND vs ENG : भारतीय क्रिकेटरचे दुखापतीमुळे कसोटी पदार्पणाचे स्वप्न भंगले