कोलंबो - भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्याला कोरोनाची लागण झाली आहे. कृणाल श्रीलंका दौऱ्यावर भारतीय संघाचा सदस्य आहे. या दौऱ्यादरम्यान कृणालला कोरोनाची बाधा झाली. एएनआयने या संदर्भातील वृत्त दिलं आहे.
एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, भारताचा खेळाडू कृणाल पांड्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. यामुळे भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघातील खेळाडूंना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं आहे. तसेच या सर्व खेळाडूंची कोरोना चाचणी देखील करण्यात आली आहे.
भारत-श्रीलंका टी-20 सामना स्थगित
भारत आणि श्रीलंका यांच्यात आज दुसरा टी-20 सामना कोलंबोमध्ये खेळवण्यात येणार होता. परंतु कृणाल पांड्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. तेव्हा आजचा सामना अचानक स्थगित करण्यात आला.
आजचा सामना कधी होणार -
एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, खेळाडूंची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. या सर्वांचे रिपोर्ट आल्यानंतर, आजचा सामना उद्या बुधवारी खेळवण्यात येणार आहे.
भारतीय संघ मालिकेत आघाडीवर
श्रीलंका दौऱ्यात प्रथम एकदिवसीय मालिका पार पडली. भारताने ही मालिका जिंकली. यानंतर आता तीन सामन्याची टी-20 मालिका खेळवण्यात येत आहे. यातील पहिला सामना भारताने जिंकत मालिकेत 1-0 ने आघाडी घेतलेली आहे.
ऋषभ पंतला देखील झाली होती कोरोनाची लागण
भारताचा सिनिअर संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत याला देखील कोरोनाची लागण झाली होती. यामुळे त्याला काही दिवस विलगीकरणात ठेवण्यात आले. कोरोनावर मात केल्यानंतर त्याला भारतीय संघासोबत राहण्याची परवानगी मिळाली.
हेही वाचा - VIDEO : चिमुकलीच्या वेटलिफ्टिंगची देशवासियांना भूरळ; मीराबाई चानूची देखील क्यूट प्रतिक्रिया
हेही वाचा - WI vs AUS : ऑस्ट्रेलियाने पराभवाचा वचपा काढला, जिंकली एकदिवसीय मालिका