लंडन - इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाच्या अडचणी काही केल्या कमी होताना दिसत नाहीयेत. शुबमन गिल आणि आवेश खान यांच्यानंतर अष्टपैलू खेळाडू वॉशिग्टन सुंदरला दुखापत झाली असून तो इंग्लंडविरुद्धच्या 5 सामन्याच्या मालिकेतून बाहेर पडला आहे. इंग्लंड दौऱ्यात दुखापतग्रस्त झालेला सुंदर तिसरा खेळाडू ठरला.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामन्याला 4 ऑगस्टपासून सुरूवात होणार आहे. त्याआधी वॉशिंग्टन सुंदर आणि आवेश खान यांना भारतीय संघाच्या काउंटी सिलेक्ट इलेव्हन विरुद्धच्या सराव सामन्यात दुखापत झाली. सुंदरचा अंगठा दुखावला गेला आहे. याची सविस्तर माहिती अजून येणे बाकी आहे.
वॉशिंग्टन सुंदर आणि आवेश खान हे दोघेही आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी उपलब्ध होणार नाही. त्याआधी शुबमन गिल दुखापतीमुळे भारतात परतला आहे. दरम्यान, ईसीबीने बीसीसीआयला विनंती केली होती की, त्यांच्याकडे 11 खेळाडू नाहीत. तेव्हा बीसीसीआयने 2 खेळाडू पाठवत काउंटी संघ पूर्ण केला होता. पण बीसीसीआयला हा निर्णय चांगलाच अंगलट आला आहे.
काय आहे प्रकरण -
काउंटी सिलेक्ट इलेव्हनमधील काही खेळाडू कोरोना बाधितांच्या संपर्कात आले होते. यामुळे त्यांना क्वारंटाइन करण्यात आले होते. अशात भारताविरुद्ध काउंटी सिलेक्टचा सामना होता. तेव्हा त्यांच्याकडे 11 खेळाडूंची भरती नव्हती. तेव्हा त्यांनी भारताकडे खेळाडूंची मागणी केली होती.
आता काय करणार बीसीसीआय
बीसीसीआयने शुबमन गिलच्या जागेवर पर्यायी खेळाडू पाठवण्यास नकार दिला होता. आता आवेश खान आणि वॉशिंग्टन सुंदर दुखापतग्रस्त झाले आहेत. यामुळे बीसीसीआय काय निर्णय घेणार याच्याकडे सर्वांचे लक्ष्य आहे. भारतीय संघ 24 सदस्यांसह इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. परंतु आता याची संख्या 21 अशी झाली आहे.
हेही वाचा - IND Vs SL : ऐन तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यानंतर श्रीलंकेचा कर्णधार व प्रशिक्षक यांच्यात वाद
हेही वाचा - IND vs ENG : भारतीय क्रिकेटरचे दुखापतीमुळे कसोटी पदार्पणाचे स्वप्न भंगले