लीड्स - भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा सामना लीड्स येथे खेळला जात आहे. पहिल्या दिवशी इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजीसमोर भारतीय संघाचा पहिला डाव केवळ 78 धावांतच आटोपला. त्यानंतर रोरी बर्न्स आणि हसीब हमीद या सलामीवीर जोडीने इंग्लंडला शानदार सुरूवात करून दिली. हे दोघे बाद झाल्यानंतर इंग्लंडने लंचपर्यंत 2 बाद 182 धावा केल्या आहेत.
इंग्लंडने आज बिनबाद 120 धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने भारताला पहिले यश मिळवून दिले. त्याने रोरी बर्न्सला क्लीन बोल्ड केले. रोरी बर्न्सने 6 चौकार आणि 1 षटकारासह 61 धावा केल्या. त्यानंतर हसीब हमीदची साथ देण्यासाठी डेविड मलान फलंदाजीला आला.
हमीद-मलानची जोडी रविंद्र जडेजाने फोडली. त्याने हमीदला क्लीन बोल्ड केले. हमीदने 12 चौकारांसह 68 धावा केल्या. हमीद बाद झाल्यानंतर कर्णधार जो रुट फलंदाजीसाठी आला. तेव्हा लंचपर्यंत इंग्लंडने 68 षटकात 2 बाद 182 धावा केल्या असून त्यांच्याकडे 104 धावांची आघाडी आहे. मलानसोबत कर्णधार जो रूट नाबाद आहे.
तत्पूर्वी, भारताचा पहिला डाव 78 धावांत आटोपला. सलामीवीर रोहित शर्मा (19) आणि अजिंक्य रहाणे (18) वगळता एकाही भारताच्या फलंदाजाला दोन आकडी धावा करता आल्या नाही. भारताकडून सर्वाधिक 35 धावांची भागीदारी, रोहित-रहाणे या जोडीने चौथ्या गड्यासाठी केली. जेम्स अँडरसन आणि क्रेग ओवरटन यांनी प्रत्येकी 3-3 विकेट घेतल्या. तर ओली रॉबिन्सन आणि सॅम कुरेन यांनी प्रत्येकी 2-2 गडी बाद केले.
हेही वाचा - Ind Vs Eng : सिराजवर प्रेक्षकांनी चेंडू फेकून मारला?, ऋषभ पंतचा खुलासा
हेही वाचा - 'गोल्डन बॉय' नीरज चोप्राने पाकिस्तानच्या अर्शद नदीमला ट्रोल करणाऱ्यांना सुनावलं, जाणून घ्या प्रकरण