नवी दिल्ली Surinder Khanna : टीम इंडियाचे माजी विकेटकीपर सुरिंदर खन्ना यांनी चालू विश्वचषकावर 'ईटीव्ही भारत'शी खास बातचीत केली. ते १९७९ चा विश्वचषक खेळलेल्या भारतीय संघाचा एक भाग होते. तसेच १९८४ मध्ये शारजाह येथे आशिया चषक जिंकून देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
प्रश्न : बाद फेरीच्या सामन्यांमध्ये भारत दडपणाखाली येतो असं म्हणतात, हे खरं आहे का?
उत्तर : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दडपण नक्कीच असतं. नॉक आऊट सामन्यांमध्ये तर ते जास्तच असतं. हे दडपण जर नसेल तर खेळाडू त्याच्या खेळाबाबत गंभीर नसतो, असं माझं मत आहे. मला आठवतंय की मी १०० मीटर शर्यतीत ऑलिम्पिक चॅम्पियनशी बोललो होतो. तीन ऑलिम्पिक जिंकल्यानंतरही त्यानं सांगितलं होतं की, तीन वेळा सुवर्णपदक जिंकूनही जेव्हा मी ट्रॅकवर येतो तेव्हा मला आज काय होईल हे माहित नाही. विराट कोहलीचं वर्क कल्चर पाहा. रोहित शर्माची फलंदाजी पाहून एखाद्याला असं वाटते की फलंदाजी ही खूप सोपी गोष्ट आहे. त्याचप्रमाणे, न्यूझीलंडमध्ये केन विल्यमसन आहे. अर्थात, आमच्या खेळाडूंबद्दल जास्त आणि त्यांच्या खेळाडूंबद्दल कमी बोललं जातं, परंतु त्यांचं कार्य देखील इतरांपेक्षा कमी नाही. तो शिस्तप्रिय आहे. तो खूप नियोजन करून खेळतो आणि जास्त बोलत नाही. त्याचं कामच बोलतं. स्पर्धा तगडी आहे. जो आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवेल तोच जिंकेल.
प्रश्न : मुंबईतील वानखेडेची खेळपट्टी लाल मातीची असून चेंडूला चांगला उसळी मिळतो आणि पहिल्या डावात मोठी धावसंख्याही केली जाते. 'नाणेफेक जिंकली तर तुम्ही सामना जिंकलात' असं तज्ज्ञांचं म्हणणे आहे. हे वाक्य या उपांत्य फेरीसाठीही योग्य आहे का?
उत्तर : अनेक घटक आहेत. रोहित शर्मा अतिशय शांत स्वभावाचा आहे. मैदानावरील कोणत्याही गोष्टीवर तो क्वचितच नाराज झालेला दिसतो. कर्णधार जेव्हा फॉर्मात असतो तेव्हा तो आपल्या खेळाडूंना चांगली कामगिरी करायला लावतो. रोहित अनुभवी आहे. त्याने मुंबईला तीन-चार वेळा आयपीएल जिंकून दिलंय. रोहित मुंबईचा असून तो त्याच्या घरी खेळतोय. संघातील चार-पाच खेळाडू मुंबईचे आहेत. त्यामुळे तेथील परिस्थितीची त्यांना जाणीव आहे. हे समतल खेळाचं मैदान आहे. तेथे विकेट कशी टिकून राहते हे पाहणं बाकी आहे. तेथे खूप उष्णता आणि आर्द्रता आहे. मॅक्सवेलनं अफगाणिस्तानविरुद्ध एकहाती द्विशतक ठोकलं. याची कोणी कल्पनाही करू शकत नव्हतं. मॅक्सवेलला तिथे क्रॅम्प येत होते, कारण मुंबईत पाणी कमी होतं आणि मीठ कमी होतं.
प्रश्न : भारतीय गोलंदाजीत अलीकडच्या काळात झालेल्या सुधारणेबद्दल तुम्ही काय सांगाल?
उत्तर : गेल्या दोन वर्षांचा विचार केला तर शमी, सिराज आणि आपले फिरकीपटू सातत्यानं चांगली कामगिरी करत आहेत. दुखापतीतून परतल्यानंतर बुमराह ज्या प्रकारे चेंडू आत आणि बाहेर वळवतोय, मला वाटतं की असं केवळ न्यूझीलंडचे वेगवान गोलंदाज बोल्ट आणि हेन्री करू शकतात. बुमराहच्या आगमनानं आपली गोलंदाजी चांगली दिसत आहे. बुमराह त्याच्या पहिल्या काही षटकांमध्ये फलंदाजांवर नियंत्रण ठेवण्यात यशस्वी ठरतो. आपल्या चांगल्या क्षेत्ररक्षणामुळे गोलंदाजांची धार आणखीनच तीक्ष्ण होते. त्याचप्रमाणे न्यूझीलंडचे बोल्ट, हेन्री आणि सँटनर हे देखील त्यांच्या पहिल्या स्पेलमध्ये धोकादायक आहेत. दोन्ही संघ संतुलित आहेत.
प्रश्न : या सगळ्याचं श्रेय तुम्ही वर्कलोड मॅनेजमेंटला देता का?
उत्तर : यावर चर्चा न केलेलीच बरी. बेंचवर कोणताही नवीन खेळाडू नाही. सर्व जुनेच खेळाडू आहेत. जयस्वाल किंवा गायकवाड संघात असते तर वर्क लोड मॅनेजमेंट झालं असं आम्ही म्हणालो असतो. आता त्याबद्दल बोलू नका. कधीतरी नंतर चर्चा करू.
प्रश्न : विराट कोहली आता ३५ वर्षांचा झाला आहे. तुम्हाला त्याच्यात किती क्रिकेट उरलेलं दिसतं?
उत्तर : वय हा फक्त एक आकडा आहे. जर तुम्हाला मैदानावर दररोज कामगिरी करून मोठी धावसंख्या करण्याची भूक असेल तर देहबोलीतून ते कळतं. विल्यमसन, स्मिथ, कोहली, रूट यांच्या जाण्यानं एक पोकळी निर्माण होईल. या चौघांची शतकं जोडली तर त्याची संख्या १२५ च्या जवळपास असेल. केवळ चाहत्यांनाच या चौघांची उणीव भासणार नाही, तर क्रिकेटलाही त्यांची उणीव भासेल.
प्रश्न : विराट कोहलीची जागा कोणता खेळाडू घेऊ शकेल असं तुम्हाला वाटतं?
उत्तर : जेव्हा नेहरूजी होते तेव्हा आम्हाला वाटायचं की त्यांच्यानंतर कोण येईल. पण त्यांच्या जाण्यानंतरही देश चालत आहे. तसंच गावस्कर, विश्वनाथ यांच्यानंतर कपिल देवसारखा कर्णधार आला. मग गांगुली आला, मग सचिन आला आणि आता विराट कोहली आला. प्रत्येक युगात मोठे खेळाडू येतच असतात. आयपीएलनं क्रिकेट मोठं केले आहे आणि आता खेळाडू वयाच्या ४२-४४ वर्षांपर्यंत खेळत आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात मोठ्या खेळाडूंची जागा कोणीही घेऊ शकत नाही.
हेही वाचा :