पुणे Cricket World Cup २०२३ : क्रिकेट विश्वचषकातील ३२ वा सामना आज न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळला गेला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं न्यूझीलंडचा १९० धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेनं निर्धारित ५० षटकांत ४ गड्यांच्या मोबदल्यात ३५७ धावा केल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघ ३५.३ षटकांत १६७ धावाचं करू शकला.
डि कॉक-व्हॅन डर डुसेनचं शतक : न्यूझीलंडनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेनं चांगली सुरुवात केली. कर्णधार टेम्बा बवुमा २४ धावा करून बाद झाला. त्यानंतर रॅसी व्हॅन डर डुसेननं डि कॉकच्या मदतीनं सामन्याची सूत्र आपल्या हाती घेतली. या दोघांनी चौफेर फटकेबाजी करत आपापलं शतक साजरं केलं. डि कॉकनं ११६ चेंडूत ११४ धावा केल्या. तर व्हॅन डर डुसेन ११८ चेंडूत १३३ धावा करून बाद झाला. त्यानंतर आलेल्या मिलरनं तुफान फटकेबाजी केली. त्यानं ३० चेंडूत ५० धावा ठोकल्या. न्यूझीलंडकडून टीम साऊदीनं ७७ धावा देत २ बळी घेतले.
न्यूझीलंडला लक्ष्य पेलवलं नाही : ३५८ धावांचं मोठं लक्ष्य न्यूझीलंडला पेलवलं नाही. सलामीवीर कॉनवे २ धावांवर परतला. तर फॉर्ममध्ये असलेला रचिन रविंद्रही केवळ ९ धावाचं करू शकला. कर्णधार टॉम लॅथमही फ्लॉप झाला. तो ४ धावा करून माघारी गेला. एकट्या ग्लेन फिलिप्सनं थोडाफार संघर्ष करत ५० चेंडूत ६० धावा केल्या. न्यूझीलंडचे इतर फलंदाज सपशेल अपयशी ठरले. दक्षिण आफ्रिकेडून केशव महाराज आणि मार्को जेन्सननं शानदार गोलंदाजी केली. या दोघांनीही अनुक्रमे ४ आणि ३ विकेट घेतल्या.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन :
- न्यूझीलंड : टॉम लॅथम (कर्णधार/यष्टिरक्षक), डेव्हॉन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, मॅट हेन्री, टीम साऊदी आणि ट्रेंट बोल्ट
- दक्षिण आफ्रिका : टेम्बा बवुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टिरक्षक), रॅसी व्हॅन डर डुसेन, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जेन्सन, कागिसो रबाडा, केशव महाराज, गीराल्ड कोएट्जी, लुंगी एनगिडी
हेही वाचा :
- Cricket World Cup 2023 : पाकिस्तान आणि बांगलादेश सामन्या दरम्यान ईडन गार्डन्सवर फडकला पॅलेस्टाईनचा झेंडा; चार जण ताब्यात
- BCCI on Environmental Concerns : बीसीसीआयचा मोठा निर्णय, वायूप्रदूषणामुळं विश्वचषक सामन्यांत 'या' शहरात होणार नाही आतिशबाजी
- Ex Cricketer Anshuman Gaikwad : यंदाचा विश्वचषक आपणच जिंकणार; माजी क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड यांनी व्यक्त केला विश्वास