लखनऊ Cricket World Cup 2023 : अटलबिहारी वाजपेयी एकना मैदानात झालेल्या ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका संघातील सामन्यात ऑस्ट्रेलियानं श्रीलंकेवर मात केली. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा लेगस्पिनर अॅडम झाम्पानं चार बळी मिळवत खळबळ उडवून दिली होती. मात्र सामन्याच्या नंतर अॅडम झाम्पानं त्याला पाठीच्या दुखण्याचा त्रास होत असल्याचं स्पष्ट केलं. मात्र पाठीचं दुखणं असतानाही झाम्पानं चार बळी मिळवल्यानं आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
अॅडम झाम्पानं घेतले चार बळी : लखनऊ इथल्या अटलबिहारी वाजपेयी एकना मैदानात श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघात चुरशीचा सामना झाला. या सामन्यात ऑस्ट्रेलियानं श्रीलंका संघावर दणदणीत विजय संपादन केला. या सामन्यात चार बळी घेत अॅडम झाम्पानं श्रीलंकन फलंदाजांची कत्तल केली. अॅडम झाम्पानं 47 धावांच्या मोबदल्यात 4 बळी घेतल्यानं श्रीलंकन संघाचं कंबरडं मोडलं.
अॅडम झाम्पाला पाठदुखीचा त्रास : ऑस्ट्रेलियन खेळाडू अॅडम झाम्पाला श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात पाठदुखीचा त्रास होत होता. मात्र त्यानं सामन्यात खेळताना हा त्रास आपल्या मार्गात आडवा येऊ दिला नाही. अॅडम झाम्पानं श्रीलंकन संघाच्या 4 फलंदाजांना तंबूत पाठवत ऑस्ट्रेलियन संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्यामुळेच अॅडम झाम्पाला सामनावीर घोषित करण्यात आलं. त्यानंतर अॅडम झाम्पानं आपण गेल्या काही दिवसापासून पाठीच्या दुखण्यानं त्रस्त असल्याचं स्पष्ट केलं.
चांगली गोलंदाजी केल्याचं समाधान : श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघात झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघानं श्रीलंकेला 209 धावातच गुंडाळलं. त्यानंतर ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी सहज लक्ष्य पार केलं. मात्र श्रीलंकेचे चार बळी घेतलेला लेगस्पीनर अॅडम झाम्पा यानं आपल्याला पाठीचा त्रास होत असल्याचं उघड केलं. आज चांगली गोलंदाजी झाली, त्यामुळे मला बरं वाटल्याचंही त्यानं यावेळी सांगितलं. पाठीचा त्रास झाला नसता, तर मी आणखी चांगली कामगिरी करू शकलो असतो, असंही झाम्पा यावेळी म्हणाला. माझं काम मधल्या फळीत बळी घेणं आहे. त्यामुळे आज घेतलेल्या बळीमुळे आनंद झाल्याचं झाम्पानं सांगितलं. खेळात उतरण्यासाठी थोडा वेळ लागला. मात्र बळी मिळवण्याची वृत्ती कायम ठेवली, त्यामुळे मला हवं, ते यश मिळाल्याचंही झाम्पानं यावेळी स्पष्ट केलं.
हेही वाचा :