दुबई - भारत आणि इंग्लंड यांच्यातील नॉटिंघम येथे खेळवण्यात आलेल्या पाच कसोटी सामन्याच्या मालिकेतील पहिला सामना संपल्यानंतर आयसीसीने कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. ताजा क्रमवारीनुसार, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने मोठी झेप घेतली आहे. तर विराट कोहलीला खराब कामगिरीचा फटका झाला आहे. रोहित शर्मा त्याच्या स्थानावर कायम आहे. बुमराह गोलंदाजांच्या क्रमवारीत टॉप-10 मध्ये पोहोचला आहे.
कसोटी क्रमवारीत जसप्रीत बुमराह 10स्थानाच्या प्रगतीसह 19व्या स्थानावरून 9व्या स्थानी पोहोचला आहे. बुमराहचे इंग्लंडविरुद्धच्या सामन्याआधी 683 गुण होते. तो टॉप 20 मध्ये होता. परंतु पहिल्या सामन्यानंतर त्याचे 760 गुण झाले आणि तो टॉप10 मध्ये पोहोचला. दुसरीकडे गोल्डन डक म्हणजे शून्यावर बाद झालेला विराट कोहलीचे क्रमवारीत नुकसान झाले आहे. तो चौथ्या स्थानावरून पाचव्या स्थानी घसरला आहे. विराटचे चौथे स्थान इंग्लंडचा कर्णधार जो रुट याने पटकावले आहे. रुटने पहिल्या सामन्यातील पहिल्या डावात अर्धशतक तर दुसऱ्या डावात शतक झळकावले होते.
आयसीसी फलंदाजाच्या क्रमवारी टॉप10 मध्ये विराट आणि रूट वगळता अन्य खेळाडूंची क्रमवारी कायम आहे. तर गोलंदाजाच्या क्रमवारीत जेम्स अँडरसनचे स्थान एका स्थानाने सुधारले आहे. तर स्टुअर्ट ब्राँडची एका स्थानाने घसरण झाली आहे. अँडरसन 7व्या स्थानावर तर ब्राँड 8व्या स्थानावर आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत एक बदल झाला आहे. भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा तिसऱ्या स्थानावरुन दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. भारतीय फलंदाज चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे यांच्यासाठी दुसरा कसोटी सामना महत्वाचा आहे. कारण ते पहिल्या कसोटी सामन्यात मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले आहेत.
आयसीसी फलंदाजी क्रमवारीतील टॉप 5 फलंदाज
- 1. केन विल्यमसन (901 गुण )
- 2. स्टिव्ह स्मिथ (891 गुण )
- 3. मार्नस लाबुशेन (878 गुण )
- 4. जो रूट (846 गुण )
- 5. विराट कोहली (791 गुण )
आयसीसी क्रमवारीतील टॉप 5 गोलंदाज
- 1. पॅट कमिन्स (908 गुण )
- 2. आर अश्विन (856 गुण )
- 3. टिम साउथी (824 गुण )
- 4. जोश हेजलवुड (816 गुण )
- 5. नील वॅग्नर (810 गुण )
आयसीसी अष्टपैलू खेळाडू क्रमवारीतील टॉप 5 खेळाडू
- 1. जेसन होल्डर (384 गुण )
- 2. रविंद्र जडेजा (377 गुण )
- 3. बेन स्टोक्स (370 गुण )
- 4. आर अश्विन (351 गुण )
- 5. शाकिब अल हसन (334 गुण )
हेही वाचा - Ind vs Eng 2nd Test, PREVIEW: शार्दुल ठाकूरला दुखापत, अश्विनला मिळणार संधी?
हेही वाचा - Eng vs Ind: BCCI अधिकारी घेणार शास्त्री आणि टीम इंडियाची भेट, महत्वपूर्ण विषयावर होणार चर्चा