दुबई - आयसीसीने ताजी टी-20 क्रमवारी जारी केली आहे. दक्षिण आफ्रिका-श्रीलंका आणि बांगलादेश-न्यूझीलंड यांच्यातील टी-20 मालिकेनंतर रॅकिंगमध्ये मोठे बदल पाहायला मिळत आहेत. फलंदाजांच्या क्रमवारीत दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉकला मोठा फायदा झाला आहे.
श्रीलंकाविरुद्धच्या तीन सामन्याच्या मालिकेत क्विंडन डी कॉकने सर्वाधिक धावा केल्या. या कामगिरीचा त्याला फायदा झाला आहे. तो चार स्थानाच्या सुधारणेसह टॉप-10 मध्ये आठव्या स्थानावर पोहोचला आहे. क्विंटन डी कॉक याने श्रीलंकाविरुद्धच्या मालिकेत 153 च्या सरासरीने आणि 121 च्या स्ट्राइट रेटने 153 धावा केल्या. दुसरीकडे आफ्रिकेचे रिजा हेंड्रिक्स आणि एडन मार्करम यांची देखील क्रमवारी सुधारली आहे. मार्करम 11 व्या तर हेंड्रिंक्स टॉप20 मध्ये पोहोचला आहे.
भारतीय कर्णधार विराट कोहलीला क्रमवारीत फायदा झाला आहे. तो एका स्थानेच्या सुधारणेसह चौथ्या स्थानी विराजमान झाला आहे. तर के एल राहुल सहाव्या स्थानावर कायम आहे. वरिष्ठ पाचमध्ये कोणते बदल झालेले नाहीत. इंग्लंडचा फलंदाज डेविड मलान अव्वलस्थानी कायम आहे. याशिवाय बाबर आझम आणि अॅरोन फिंच अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी आहेत.
गोलंदाजांच्या क्रमवारीत बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानने मोठी झेप घेतली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या टी-20 सामन्यात त्याने 4 गडी बाद केले होते. तो दोन स्थानाच्या सुधारणेसह आठव्या स्थानी पोहोचला आहे. तर टॉप-5 मध्ये कोणतेही बदल झालेले नाहीत. दक्षिण आफ्रिकेचा तबरेज शम्सी अव्वलस्थानी कायम आहे. याशिवाय वनिंदु हसरंगा, राशिद खान, आदिल रशिद आणि मुजीब उर रहमान अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत.
हेही वाचा - IPL 2021: कमी अलविदा ना कहना! अनिल कुंबळे, वसीम जाफर यांनी गायलं गाणं, पाहा व्हिडिओ
हेही वाचा - ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज मिशेल स्टार्कची क्रिकेटर पत्नी एलिसा हिलीची रोहित शर्मावर नजर