मुंबई - यंदाचा टी-२० विश्वकरंडक भारतात होणार नसल्याची माहिती बीसीसीआय सचिव जय शाह यांनी दिली. टी-२० विश्वकरंडक यूएईमध्ये होणार असून या स्पर्धेच्या तारखा आयसीसी जाहीर करेल, अशी माहिती जय शाह यांनी एएनआयशी बोलताना दिली. या वृत्ताला बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी देखील दुजोरा दिला आहे.
भारतातील कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. परंतु, तिसऱ्या लाटेची दाट शक्यता वर्तवली जात आहे. ही लाट ऑगस्ट-सप्टेंबर या महिन्यात येऊ शकते, असा अंदाज व्यक्त होत आहे. दुसरीकडे आयपीएलचा चौदावा हंगाम देशातील कोरोना स्थिती आणि खेळाडूंना झालेली कोरोनाची लागण पाहून अचानक स्थगित करण्यात आला. त्यानंतर टी-२० विश्वकरंडक स्पर्धेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.
बीसीसीआयला आता उर्वरित आयपीएल स्पर्धा पूर्ण करायची आहे. तसेच विश्वकरंडकाचे यजमानपद देखील भूषवायचे आहे. यामुळे उर्वरित आयपीएल आणि टी-२० विश्वकरंडक यूएईमध्ये खेळवण्याच्या विचारात बीसीसीआय आहे. दरम्यान, टी-२० विश्वकरंडकाचे आयोजन १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीत करण्यात येणार असल्याची शक्यता आहे. त्याआधी उर्वरित आयपीएलचा हंगाम खेळवला जाणार आहे. आयपीएल संपल्यानंतर लगेच टी-२० विश्वकरंडक स्पर्धेला सुरूवात करायची असा मानस, बीसीसीआयचा आहे.
भारतात टी-२० विश्वकरंडक होणार नाही. ही स्पर्धा यूएईमध्ये खेळवली जाणार आहे. आयसीसी या स्पर्धेच्या तारख्या जाहीर करेल, अशी माहिती बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी एएनआयला बोलताना दिली. परंतु बीसीसीआयने घेतलेल्या या निर्णयामुळे भारतीय चाहत्यांचा हिरमोड झाला आहे.
हेही वाचा - ENGW vs INDW १st ODI: टॅमी-नतालीची तुफानी खेळी; इंग्लंडकडून भारताचा दारुण पराभव
हेही वाचा - बेन स्टोक्सने जुना हिशोब केला चुकता; ब्रेथवेटला चोपलं, पाहा व्हिडिओ